पाऊले चालती तुळजापूरची वाट…; कोजागरीनिमित्त शेकडो भाविकांनी रस्ते फुलले

नवरात्रोत्सवानंतरही तुळजापूरला तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा ओघ सुरूच आहे. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री तुळजापुरात दर्शनासाठी शेकडो किलोमीटर अंतरावरावरून भाविक सश्रद्ध भावनेने पायवाट तुडवत जातात.

सोलापूर : नवरात्रोत्सवानंतरही तुळजापूरला तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा ओघ सुरूच आहे. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री तुळजापुरात दर्शनासाठी शेकडो किलोमीटर अंतरावरावरून भाविक सश्रद्ध भावनेने पायवाट तुडवत जातात. आज सकाळपासून सोलापूरसह अन्य मार्गांवरून तुळजापूरकडे जाणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.

सोलापूर जिल्ह्यासह शेजारच्या कर्नाटकातील विजापूर, बागलकोट, गदग, हुबळी, धारवाडसह कलबुर्गी, बीदर तसेच तेलंगणा भागातून असंख्य भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. यात स्त्री-पुरूष, बालबच्च्यांसह जाणाऱ्या भाविकांचे पाय सपासप पुढे सरकत होते. दुपारी ऊन उतरल्यानंतर भाविकांचे लोंढे आणखी वाढले होते. ‘आई राजा उदो उदो’ चा गजर अखंडपणे चालू होता. अनेक भाविक अनवाणी तुळजापूरची वारी करताना दिसून आले. पावलापावलांवर उत्साह वाढत होता. तुळजाभवानीच्या जयकाराने भाविकांचा थकवा क्षणात दूर होत होता.

हे वाचले का?  राज्यभरात थंडीची चाहूल, किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्या खाली

नवरात्रोत्सवाची सांगता होताना तुळजाभवानी मंदिरात तुळजाभवानी मातेची निद्रा सुरू होते. कोजागरी पौर्णिमेला रात्री तुळजाभवानी मातेची निद्रा संपते. तेथे रात्रभर उत्सव असतो. कोजागरी पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात तुळजाभवानी मातेचे दर्शन घेणे भाग्याचे असल्याची भाविकांची पारंपरिक श्रद्धा आहे. अलीकडे काही वर्षांपासून कोजागरी पौर्णिमेला तुळजापूरकडे जाणाऱ्या भाविकांची उच्चांकी गर्दी होताना दिसून येते. दूर दूरच्या गावावरून ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत तुळजापूरला पायी चालत तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्याची ही परंपरा नेमकी केव्हा सुरू झाली, याचा इतिहास ज्ञात नाही.

हे वाचले का?  भाजपा उमेदवारांची यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी? श्रीगोंद्यात सुवर्णा पाचपुतेंचा निर्धार, “पक्षाला ताकद दाखवणार”

भाविकांची होणारी प्रचंड गर्दी विचारात घेऊन पोलीस प्रशासनाने तुळजापूरकडे जाणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवले आहेत. वाहन वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आले आहेत. रस्त्यावर थोड्या थोड्या अंतरावर भाविकांसाठी अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्थांनी चहा-पाणी, न्याहारी, प्रसादाची व्यवस्था केली आहे. जागोजागी भाविकांना फळांचे वाटप केले जात आहे. काही संस्थांनी भाविकांचा थकवा दूर करण्यासाठी अंग मालिश करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली होती. वेदनाशामक औषधांचेही वाटप केले जात आहे. तर काही संस्थांनी तात्पुरत्या स्वरूपात विश्रांतीची व्यवस्थाही केली आहे.

हे वाचले का?  शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता