पाच हजार रुपयांहून अधिक देणगी देणाऱ्यांचा शोध

संमेलनाचे काम जलद व्हावे यासाठी ३९ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे

बैठकांना गैरहजर राहणाऱ्यांना थांबविणार

नाशिक : राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव वाढत असला तरी शासनाचे धोरण आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती लवकर निवळेल अशी आशा बाळगून संयोजकांनी ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू ठेवली आहे. संमेलनास अतिशय कमी दिवसांचा कालावधी राहिल्याने आवश्यक तो निधी जमविण्यासाठी समित्यांचे पदाधिकारी, सदस्यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. पाच हजारापेक्षा अधिक देणगी देणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा शोध घेण्याची जबाबदारी काही समित्यांवर सोपविली गेली आहे. सदस्यांनाही १०० रुपये देणगीची पुस्तके देऊन निधी संकलनास सांगण्यात आले आहे. तयारीच्या कामात चाललेल्या बैठकांना तीन वेळा गैरहजर राहणाऱ्या सदस्यांना विनम्रपणे थांबविले जाणार आहे.

२६ ते २८ मार्च या कालावधीत येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनावर करोनाचे मळभ गडत होत आहे. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ हे करोनाबाधित झाल्यानंतर संमेलनासमोरील अडचणींमध्ये अधिकच वाढ झाली. परंतु, या स्थितीतही संमेलनाची जोरदार तयारी केली जात असल्याचे लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी म्हटले आहे. संमेलनाच्या नियोजनासाठी काही समित्या ऑनलाईन तर काही समित्या सुरक्षिततेचे सर्व नियम पाळत ऑफलाईन (प्रत्यक्ष) बैठकी घेत आहेत. संमेलनासाठी एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी आहे. शासनाच्या धोरणामुळे तसेच नागरिकांच्या सतर्कतेमुळे लवकरच परिस्थिती निवळेल असे आशादायी चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, आयोजकांना सध्यातरी वाट पाहणे हिच भूमिका ठेवावी लागणार आहे. याबाबतीत शासनाच्या त्या त्या वेळेच्या निर्देशानुसारच काम पार पडेल आणि वेळ आली तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि संमेलनाची स्वागत समिती सल्लामसलत करून योग्य तो निर्णय घेतील, असेही जातेगावकर यांनी म्हटले आहे.

हे वाचले का?  दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा

संमेलनाचे काम जलद व्हावे यासाठी ३९ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. समित्यांच्या कामकाजासाठी खास नियमावली आखून देण्यात आली आहे. मध्यंतरी समिती सदस्यांकडून शुल्क घेण्याची सूचना स्वागताध्यक्षांनी केली होती. करोना काळातील या संमेलनाच्या खर्चात बरीच वाढ झाली आहे. त्यामुळे शक्य त्या मार्गाने निधी संकलनाचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाच हजारापेक्षा अधिक देणगी देणाऱ्या व्यक्ती, संस्था यांचा शोध घेण्यास सांगण्यात आले आहे. समिती सदस्यांनी कमीत कमी १०० देणगीदार शोधणे संयोजकांना अपेक्षित आहे.  समित्यांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक सदस्याने किमान ५०० रुपये देणगी देणे अभिप्रेत आहे. शिवाय समितीतील प्रत्येक सदस्याला १०० रुपयांच्या १०० पावत्या असणारे पावती पुस्तक दिले जाईल. कोणावर कोणताही दबाव न आणता १०० रुपये देणगी मूल्य प्रत्येकाने जमाकरण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगण्यात आले आहे.

हे वाचले का?  मोदी यांच्या सभेस चार उमेदवार अनुपस्थित; देवळालीतील सरोज अहिरे व्यासपीठावर, शिंदे गटाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

बैठकीची माहिती देण्यावर निर्बंध

संमेलनासाठी स्थापित बैठकांची आणि त्यात झालेल्या निर्णयांची माहिती पूर्वपरवागीशिवाय परस्पर एकही सदस्य समाज माध्यमाद्वारे देणार नाही. त्याची जबाबदारी समिती प्रमुख, उपप्रमुखावर सोपविली गेली आहे. कोणत्याही समितीच्या निर्णय प्रक्रियेत, बैठकीत लोकहितवादी मंडळाच्या अर्थात पालक पदाधिकाऱ्यांना सामावून घेण्यास सांगण्यात आले आहे. सध्या विविध समित्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. सदस्य म्हणून समितीत सहभागी झालेले जे कोणी तीन बैठकांना अनुपस्थित राहतील त्यांना विनम्रपणे थांबण्याची विनंती करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी नवीन नेमणूक करण्याचे अधिकार समिती प्रमुखाला बहाल करण्यात आले आहे. बैठकीचा अहवाल वेळोवेळी मुख्य समन्वयकांना द्यावा लागत आहे. बैठकीचे इतिवृत्त आणि उपस्थितांच्या स्वाक्षरीसह नांवे २४ तासाच्या आत संयोजक, नियोजन समितीकडे पाठवणे बंधनकारक आहे.

हे वाचले का?  RBI Repo Rate: व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचं ‘आस्ते कदम’ चालूच; सलग दहाव्यांदा कोणतेही बदल नाहीत!