पावसाचा जोर वाढल्याने कास तलाव भरला, सातारकरांच्या वर्षभराची पाण्याची चिंता मिटली

सातारा शहराची लाईफ लाईन असणारा कास तलाव पावसाचा जोर वाढल्यामुळे ओसंडून वाहू लागला.

सातारा : सातारा शहराची लाईफ लाईन असणारा कास तलाव पावसाचा जोर वाढल्यामुळे ओसंडून वाहू लागला. कास धरणाच्या भिंतीवरून पाणी वाहू लागले आहे. तलावात आता ०.००५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. कास तलाव भरल्यामुळे सातारकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न आता मिटला आहे.

सातारा पालिकेने कास धरणाची १२.४३ मीटर उंची वाढवल्यानंतर काल धरण प्रथमच पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. सातारा शहराची२०४० पर्यंतची लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन कास धरणाची उंची १२.४२ मीटर उंची वाढवण्यात आली होती. या कामासाठी तब्बल ६० कोटी रुपये खर्च आला. सातारा शहरासह पठारावरील १५ गावांची तहान हा तलाव भागवत असतो. कास धरणाची भिंत वाढवण्याबरोबर धरणाच्या पिछाडीला पायऱ्यांचे टप्पे करण्यात आले आहेत. सततचा पाऊस, मंद धुके, निसर्गरम्य वातावरण यामुळे कास धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढतच आहे.

हे वाचले का?  Nawab Malik : “आम्ही किंगमेकर राहणार, आमच्याशिवाय कोणतंही सरकार…”, अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान

शनिवारी दुपारी साडेबारा वाजता कास धरण ओव्हर फ्लो झाले आहे. तीनच दिवसापूर्वी कास तलावामध्ये ५६ फूट पाणीसाठा झाला होता. पावसाचा जोर कायम राहिल्याने कास धरण भरून वाहू लागले. धरण परिसर हा घळीप्रमाणे असल्यामुळे डोंगरातील ओहोळांचे पाणी खळखळून तलावांमध्ये येत आहे. गेल्या पाच दिवसापासून पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरण ओसंडून वाहिले आहे.

हे वाचले का?  Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: कालीचरण यांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका: म्हणाले…