पीक पाण्यात!

शेतकरी हवालदिल; पश्चिम महाराष्ट्र, कोकणात पूरस्थिती

धान्यरूपी लक्ष्मी लवकरच घरी येणार, या शेतकऱ्यांच्या आशेवर अतिवृष्टीने पाणी फेरले. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातल्या उन्हाळे येथे कापणीनंतर मळ्यात ठेवलेल्या भातपिकाचे नुकसान झाले.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाचा कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसला. अतिवृष्टीमुळे सांगली, सोलापुरातील खरीप पिके, भाजीपाल्यासह कोकणातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली जिल्ह्य़ाला बुधवारी सायंकाळनंतर झालेल्या तुफानी पावसाने मोठा तडाखा दिला. या दोन जिल्ह्य़ांच्या बहुतांश भागात शंभर मिलिमीटरच्या सरासरीने अतिवृष्टी झाली. याशिवाय पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्य़ांतही नुकसान केले आहे. या पावसाने या भागातील नद्यांना पूर आले, शेत-शिवारात पाणी शिरले. हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यात ५६५ गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. पाऊस कोसळत असतानाच बुधवारी रात्रीपासून उजनीतून अडीच लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने भीमा नदीकाठच्या अकलूज, पंढरपूर, सांगोला आदी तालुक्यांना मोठा फटका बसला. जिल्ह्य़ातील १७ हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. बचावकार्यासाठी ‘एनडीआरएफ’च्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले.

हे वाचले का?  उत्तर महाराष्ट्रात ६५ टक्के मतदान

सांगली जिल्ह्य़ातील कृष्णेसह येरळा, अग्रणी, नांदणी, माणगंगा आदी नद्यांना पूर आला तर अनेक मार्गावर पाणी आल्याने ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. कृष्णा नदीची पाणीपातळी केवळ २४ तासांत २५ फुटांनी अचानक वाढल्याने नदीकाठच्या रहिवाशांना हलवण्यासाठी प्रशासनाची धावपळ उडाली. खरिपाची काढलेली पिके, भाजीपाला शेतातच सडून गेला. नदीकाठच्या शेतातील पिकांसह मातीही वाहून गेली आहे.

पुणे जिल्ह्य़ातील इंदापूर तालुक्याला पावसाचा मोठा फटका बसला. तालुक्यात अनेक ठिकाणी पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले. पळसदेव, भादलवाडी, मदनवाडी येथील तलावांना भगदाड पडून पिके, ताली, बांध-बंदिस्त केलेली शेती यांचे मोठे नुकसान झाले. बारामती तालुक्यातही दीडशे मिमी पावसाची नोंद झाली असून, शेतीचे मोठे नुकसान झाले.

सातारा जिल्ह्य़ात बुधवारी मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाने शेतीचेही मोठे नुकसान झाले. पावसाचा जोर वाढल्यावर कोयनेसह अनेक धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला. कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून ३३,९२१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोल्हापुरातही दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने पंचगंगेची पातळी २४ तासांत १० फुटांनी वाढली आहे.

हे वाचले का?  पूर्व लडाखमध्ये सैन्यमाघारी पूर्ण, भारत-चीन सैनिकांमध्ये आज दिवाळीच्या मिठाईची देवाणघेवाण

रत्नागिरीत कापणीला आलेल्या सुमारे ३० टक्के भातशेतीचे नुकसान झाले. रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीचे एकूण क्षेत्र ६८ हजार हेक्टर, तर नाचणीचे ९ हजार हेक्टर आहे. गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी हाताशी आलेले पीक आडवे झाले. राजापूर तालुक्यातील अर्जुना, कोदवली आणि रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीला पूर आला. अर्जुना नदीच्या पुरामुळे गोठणे दोनिवडेसह इतर गावांतील शेतीचे मोठे नुकसान झाले. पुराचे पाणी राजापूर बाजारपेठेत घुसले. जवाहर चौकातील काही टपऱ्या पाण्याखाली गेल्या.

रायगडमध्ये अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका भातशेतीला बसला. वादळी पावसामुळे कापणीला आलेले पीक आडवे झाले. काही ठिकाणी कापून शेतात ठेवलेले पीक भिजले. रायगड जिल्ह्यात यंदा ९४ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली होती. मात्र, पावसामुळे भातपीक धोक्यात आले आहे.

१७ जणांचा मृत्यू

* राज्यात अतिवृष्टीने १७ जणांचा बळी घेतला. त्यात सोलापूर जिल्ह्यातील १४ आणि पुणे जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे.

* सोलापूर जिल्ह्य़ातील मृतांमध्ये पंढरपूरमध्ये घाटाची भिंत कोसळून झालेल्या अपघातातील सहा जणांबरोबरच

माढा तालुक्यात चार, बार्शीत दोन आणि दक्षिण सोलापुरातील एकाचा समावेश आहे.

हे वाचले का?  आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर

* पुणे जिल्ह्य़ातही दौंड तालुक्यातील खानोटा येथे ओढय़ाला आलेल्या पुरात चौघे जण वाहून गेले. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. यातील तिघांचे मृतदेह सापडले आहेत.

शनिवारी पाऊस ओसरणार..

पुणे : राज्याच्या बहुतांश भागात हाहाकार उडवून दिलेल्या पावसाचा जोर शनिवारी (१७ ऑक्टोबर) ओसरणार असून, शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) कोकण विभागात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. कमी दाबाचा पट्टा पुढे अरबी समुद्रात राज्याच्या किनारपट्टीवरून गुजरातच्या किनारपट्टीवर जाणार आहे. त्यानंतर राज्यातील पावसाचा जोर कमी होईल.