मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला फटका; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
औरंगाबाद / नाशिक : मराठवाडय़ात अतिवृष्टीने पिके पाण्यात गेली असून, खरीप हंगाम हातचा गेला आहे. सोयाबीन सडून गेले असून, ऊस मुळासह गळून पडला. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मराठवाडय़ातील ४४६ महसूल मंडळांपैकी ३६१ मंडळांत अतिवृष्टी नोंदविण्यात आली. त्यातील २४८ महसूल मंडळांत दोनदा तर ९६ महसूल मंडळांत तीन वेळा अतिवृष्टी नोंदविण्यात आली. बीड आणि लातूर जिल्ह्यातील पाटोदा महसूल मंडळात ११ वेळा अतिवृष्टी झाली. या गावातील शेतकरी भीमराव पवार म्हणाले, आता सारे पाण्यातच आहे. काही शेतात नुसताच गाळ दिसतो आहे. सारे पीक हातचे गेले आहे. ही फक्त एका शेतकऱ्याची अवस्था नाही तर मांजरा नदीच्या भोवताली पाच किलोमीटरच्या पट्टय़ात सारे चित्र असेच आहे. जनावरे वाहून गेली आहेत. या महसूल मंडळात काम करणाऱ्या महसूल अधिकारी देशमुख म्हणाल्या, ‘आधीचा पंचनामा करेपर्यंत पुढे आणखी पाऊस येतो. पूर स्थितीमुळे पंचनामे करणेही अवघड होऊन बसले आहे. पण आधी माणूस वाचविणे हे काम केले. आता पंचनामे करीत आहोत.’’ याच मंडळातील देवळा गावातील सरपंच नामनाथ सोपान म्हणाले, ‘‘सोयाबीन काढताना राम बाबासाहेब कदम हा ३१ वर्षांचा तरुण वाहून गेला. त्याच्या वडिलांचे आधीच निधन झाले होते.’’ नदी किनारच्या पाटोदा मंडळातील १९ गावांची अवस्था वाईट आहे. पिके सडून गेली आहेत. शिवारात पाणीच पाणी आहे. मराठवाडय़ात सर्वाधिक पाऊस जालना जिल्ह्यात सरासरीपेक्षा १७८ तर लातूरमध्ये सर्वात कमी म्हणजे सरासरीच्या १२८ टक्के पाऊस झाला आहे.
मराठवाडय़ात सोयाबीन आणि ऊस शेतीला मोठा फटका बसला. मराठवाडय़ात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत ३५ लाख ६४ हजार ६९१ शेतकऱ्यांची २५ लाख ९८ हजार हेक्टर शेती बाधित झाली असावी, असा प्रशासनाचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रातही पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. नाशिकच्या ग्रामीण भागांत कपाशी, कांदा, मका, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. जळगाव- शहरासह जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जामनेर या तालुक्यांत मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मराठवाडय़ातील अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेला आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करायला हवी. तशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सतीश चव्हाण, आमदार पदवीधर
मराठवाडय़ात दोन दिवसांत २२ जणांचा मृत्यू
औरंगाबाद : गेल्या दोन दिवसांत मराठवाडय़ात २२ जणांचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांतील जनावरांच्या मृत्यूचा आकडा ३९३ एवढा आहे. मराठवाडय़ात जूनपासून ९१ जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत १४९६ जनावरे वाहून गेली आहेत.
‘सीईटी’ हुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी
मुंबई : राज्याच्या अनेक भागांत झालेली अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे काही विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देणे शक्य झाले नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी ९ व १० ऑक्टोबरला पुन्हा परीक्षा घेण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी दिली.
गोदाकाठाला सतर्कतेचा इशारा
औरंगाबाद, नाशिक : ‘गुलाब’ चक्रीवादळाच्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव मंगळवारी कमी झाल्याने मराठवाडय़ाला काहीसा दिलासा मिळाला असला तरी नगर आणि नाशिक जिल्ह्य़ात झालेल्या पावसामुळे जायकवाडीत १ लाख ३३ हजार ८८२ दशलक्ष घनमीटर पाणी आले. त्यामुळे सकाळी ११ वाजता गोदा नदीच्या पात्रात १० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. सायंकाळी विसर्गाचा वेग ६६ हजार क्युसेक करण्यात आला आहे. दरम्यान, गोदावरीचे खालचे १७ उच्चपातळी बंधारे भरलेले असल्याने नांदेड शहराजवळ गोदावरी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. मराठवाडय़ातील ९ मोठी धरणे काठोकाठ भरली असून, जायकवाडीची पाणीपातळी ९४.८३ टक्के आहे. नांदूर मधमेश्वर येथे नगर व नाशिक येथून येणाऱ्या पावसाचा प्रवाह ४५ हजार ८२ दलघमी असल्याने जायकवाडीतून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
नांदेडमधील जुना पूल भागात गोदावरीची धोक्याची पातळी ३५१ मीटर असून, तेथून ३५२.६५ मीटर उंचीवरून जलप्रवाह सुरू आहे. धोक्याची पातळी काहीशी ओलांडली असल्याने देगलूर नाका व परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याची कार्यवाही मंगळवारी करण्यात आली होती. आपेगाव, हिरडपुरी, मंगरुळ, राजाटाकळी, लोणीसावंगी, ढालेगाव, मुदगल, मुळी, दिग्रस, अंतेश्वर यांसह सर्व बंधाऱ्यातून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सलग तिसऱ्या वर्षी जायकवाडीतून विसर्ग
जायकवाडी धरणातून सलग तिसऱ्या वर्षी नदीपात्रात पाणी सोडावे लागले आहे. २०१९ मध्ये १५ ऑगस्ट रोजी तर २०२० मध्ये ४ सप्टेंबरला पाणी सोडण्यात आले होते. सोडण्यात आलेल्या पाण्याचा प्रवाह तुलनेने कमी आहे. त्यामुळे लगेच परिस्थिती बिघडेल, अशी स्थिती नाही. जायकवाडीतून १ लाख १६ हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडले तर पैठण शहराच्या सखल भागात पाणी येते, असा अनुभव आहे.
गोदावरी नदीने प्रथमच पूरपातळी गाठली
नाशिक : मुसळधार पावसाने नाशिक जिल्ह्य़ातील बहुतांश भागांना झोडपले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने १५ धरणांमधून मोठय़ा प्रमाणात विसर्ग करावा लागला. गोदावरी व कादवा नदीला पूर आला असून अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहात आहेत. पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली. ११ तालुक्यातील ४३ मंडळात ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. काही मंडळात १३२ तर काही ठिकाणी ७० मिलीमीटर पाऊस झाला. गंगापूर धरणातून १० हजारहून अधिक क्युसेक पाणी सोडण्यात आले. यामुळे शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला प्रथमच पूर आला. रामसेतूला पुराचे पाणी टेकल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. नदीकाठची लहान मंदिरे पाण्याखाली गेली असून प्रशासनाने आधीच सतर्कतेचा इशारा दिल्यामुळे नदीकाठच्या दुकानदारांनी सर्व सामान इतरत्र हलविल्यामुळे फारसे नुकसान झालेले नाही.
अतिवृष्टीची महसूल मंडळे वाढली..
मराठवाडय़ातील ४४६ महसूल मंडळापैकी ३६१ महसूल मंडळात आतापर्यंत अतिवृष्टी झाली आहे. दोन वेळा अतिवृष्टी झालेले २४८ मंडळे असून तीन वेळा अतिवृष्टी झालेली ९६ मंडळे आहेत. बीड जिल्ह्य़ातील पाटोदा महसूल मंडळात तब्बल
११ वेळा अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. त्यामुळे पीक पूर्णत: गेले असल्याचे सांगण्यात येते. आता ऊसही आडवा झाला असून सोयाबीन तर हातचे गेल्याचे सांगण्यात येते.