पुणे: राज्यातील तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या तीन मूल्यांकन चाचण्या; १७ ते १९ ऑगस्टदरम्यान पायाभूत चाचणी

स्टार्स प्रकल्पाअंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी आणि दोन संकलित मूल्यमापन चाचण्या अशा तीन चाचण्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

पुणे : स्टार्स प्रकल्पाअंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी आणि दोन संकलित मूल्यमापन चाचण्या अशा तीन चाचण्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी १७ ते १९ ऑगस्टदरम्यान, तर अन्य चाचण्या ऑक्टोबर आणि एप्रिलमध्ये होणार असल्याचे विद्या प्राधिकरणाने जाहीर केले. शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात तीन शैक्षणिक प्रगती चाचण्या घेतल्या जाणार आहेत. या चाचण्या मागील इयत्तेचा अभ्यासक्रम, मुलभूत क्षमता या वर चाचणी आधारित असतील.

हे वाचले का?  कोकणात माकडांचा उपद्रव वाढला; ३५ लाख खर्च करुन वन विभाग माकडे पकडण्याची मोहीम हाती घेणार

पायाभूत चाचणीमध्ये तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची १७ ऑगस्टला भाषा विषय, १८ ऑगस्टला गणित आणि १९ ऑगस्टला इंग्रजी विषयाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पहिली संकलित मूल्यमापन चाचणी ऑक्टोबरच्या शेवटच्या किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात, दुसरी संकलित चाचणी एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे नियोजन आहे.

राज्यभरातील शाळांना पायाभूत चाचणीच्या प्रश्नपत्रिकांसोबत शिक्षक सूचनापत्र, विषयनिहाय, शाळानिहाय आणि इयत्तानिहाय उत्तरसूची पुरवण्यात येईल. प्रश्नपत्रिका फाटणार किंवा भिजणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे आहे. संबंधित चाचण्या दहावी-बारावी परीक्षेप्रमाणे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त ताण देऊ नये असे विद्या प्राधिकरणाचे प्रभारी संचालक कृष्णकुमार पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

हे वाचले का?  ”शरद पवारांनी मराठा समाजाचे वाटोळे केले”; मनोज जरांगेंचं टीकास्र; म्हणाले, ”त्यांना जमलं नाही म्हणून…”

चाचणीचा उद्देश

ही चाचणी अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ करण्यास मदत करणारी असेल. तसेच या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती संपादणूक पडताळणे, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणातातील संपादणूक वाढवण्यासाठी मदत, अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी कृतिकार्यक्रम तयार करणे, इयत्ता आणि विषयनिहाय राज्याची संपादणूक स्थिती समजून घेतली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हे वाचले का?  Maharashtra Election 2024 : यवतमाळमध्ये महायुती वर्चस्व कायम राखणार का ?