पुण्यात १०९ लसीकरण केंद्र बंद, “आम्हाला कृपया लसींचा पुरवठा करा”; सुप्रिया सुळेंची केंद्राला विनंती

पुण्यातील १०९ केंद्रांसह पनवेल, सांगली, साताऱ्यातही लसीकरण ठप्प…

राज्यात एकीकडे करोना रुग्णांची संख्या वाढत असताना करोना लसीच्या तुटवड्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लसच उपलब्ध नसल्याने पुणे जिल्ह्यातील १०९ लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद झालं आहे. लोकसभा खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी याबाबत माहिती दिली. तसेच लसीकरण बंद असल्यामुळे अनेकांना परत जावं लागत असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे आम्हाला कृपया लसींचा पुरवठा करावा अशी मागणी त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा मतदारांवर किती परिणाम होईल? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…

“पुणे जिल्ह्यात बुधवारी लसींचा साठा संपल्याने १०९ लसीकरण केंद्र बंद होते. ३९१ केंद्रांवर बुधवारी ५५ हजार ५३९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. पण, लसीचा साठा संपल्यामुळे हजारो लोकांना लसीकरण न करताच परत जावं लागलं”, असं सुप्रिया सुळे यांनी ट्विटरद्वारे सांगितलं. शिवाय, “लसीच्या अभावामुळे आपला लसीकरणाचा वेग कमी होऊ शकतो. जीव वाचविण्यासाठी, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था लवकरात लवकर रुळावर आणण्यासाठी संमती असलेल्या प्रत्येकाला लस देण्याचा आमचा निर्धार आहे. त्यामुळे कृपया आम्हाला लसीचा पुरवठा करा”, अशी विनंती त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना टॅग करत केली.
याशिवाय, पुण्यात मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येत असल्याने आरोग्य यंत्रणेवरही ताण वाढू लागला आहे. रुग्णांना उपचारासाठी वेटिंगवर थांबावं लागत आहे. पुण्यात अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना व्हेंटिलेटर बेड्स मिळत नसल्याची ओरड होत आहे. यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही केंद्र आणि राज्य सरकारला पत्र लिहून पुण्यातील आरोग्य व्यवस्थेची व्यथा मांडली आहे. पत्राद्वारे व्हेंटिलेटर बेड्स पुरवण्याची मागणी केली आहे. ज्या राज्यात करोना रुग्णसंख्या आटोक्यात आहे. त्या राज्यातून व्हेंटिलेटर बेड्स पुण्यात देण्यात यावे अशी विनंती त्यांनी पत्रातून केली आहे.

हे वाचले का?  Maharashtra Assembly Election 2024: नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात निवडणुका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले सूतोवाच!

दरम्यान, करोना लसीच्या तुटवड्यामुळे पुण्यातील १०९ केंद्रांसह पनवेल, सांगली, साताऱ्यातही लसीकरण ठप्प झाले आहे.