ॲडिनोव्हायरस नावाच्या एका विषाणूमुळे सध्या शहरातील मुलांमध्ये हा संसर्ग दिसून येत असून, हा विषाणू श्वसनसंस्था, आतडी, डोळे आणि मूत्रमार्गाच्या अस्तरावर वाढतो.
पुणे शहरातील शाळकरी मुलांमध्ये सध्या ताप, सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढत असून, या पार्श्वभूमीवर पालकांनी कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. ॲडिनोव्हायरस नावाच्या एका विषाणूमुळे सध्या शहरातील मुलांमध्ये हा संसर्ग दिसून येत असून, हा विषाणू श्वसनसंस्था, आतडी, डोळे आणि मूत्रमार्गाच्या अस्तरावर वाढतो. त्यामुळे सर्दी, न्यूमोनिया, पचनाच्या तक्रारी आणि लघवीचा संसर्ग होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
गेल्या काही दिवसांपासून पाच वर्षे ते १५ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये विषाणूजन्य आजाराचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. ताप, घसा दुखणे, डोळे लाल होणे, जुलाब, उलट्या अशी लक्षणे मुलांमध्ये दिसून येत आहेत. ही सगळी लक्षणे प्रामुख्याने ॲडिनोव्हायरसच्या संसर्गाची असून, हा संसर्ग गंभीर नाही. आठवडाभर याची लक्षणे राहतात आणि कमी होतात, मात्र दरम्यानच्या काळात पूर्ण विश्रांती घेणे आवश्यक आहे, असे बालरोग तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पारीख म्हणाले, ॲडिनोव्हायरसचा संसर्ग हा सौम्य स्वरुपाचा संसर्ग आहे. या आजारात मुलांना फारशी औषधे देण्याची गरज भासत नाही. लक्षणांमध्ये डोळ्यांची जळजळ आणि लघवीचा संसर्ग असेल तर सौम्य औषधांनी गुण येतो. ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच दिली जाणे आवश्यक आहे, हे पालकांनी लक्षात ठेवावे. मुलांनी पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. त्यांना गर्दीत नेणे, शाळेत पाठवणे यामुळे इतर मुलांमध्ये संसर्गाचे संक्रमण होण्याची शक्यता असते. हात धुणे, चेहऱ्याला हात न लावणे या बाबीही महत्त्वाच्या आहेत, असेही डॉ. पारीख यांनी स्पष्ट केले.
डॉ. सम्राट शहा म्हणाले, ॲडिनोव्हायरसची लक्षणे असलेली बहुतांश मुले शाळकरी विद्यार्थी आहेत. एकाला झालेल्या संसर्गातून दुसऱ्याकडे संक्रमण होत असल्याने लक्षणे असल्यास मुलांना शाळेत न पाठवणे उपयुक्त ठरेल. शिंका, खोकला आणि स्पर्शातून त्याचा संसर्ग होत असल्याने एकत्र न येणे हाच संसर्ग रोखण्याचा उपाय आहे. सतत तोंड, नाक, डोळे यांना स्पर्श करणे, बाहेरील पृष्ठभागांना लागलेले हात न धुताच चेहऱ्याला लावणे, डोळे चोळणे या गोष्टी टाळल्यास संक्रमण रोखणे शक्य आहे, असेही डॉ. शहा यांनी स्पष्ट केले.
ही काळजी घ्या
- संसर्ग असलेल्या मुलांना शाळेत, घराच्या आवारात खेळायला पाठवू नये.
- मुलांना रोज ताजे, गरम जेवण द्या.
- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये याची काळजी घ्या.
- हात धुणे आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी लावा.