कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडल्याने पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग चार दिवस बंद करण्यात आला होता
कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडल्याने पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग चार दिवस बंद करण्यात आला होता. परिणामी शेकडो वाहनं मार्गाच्या दोन्ही दिशेला अडकून पडली होती. पूराचे पाणी कमी होत नसल्याने महामार्ग सुरू करण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्यानंतर पाणी कमी झाल्यानंतर सोमवारी हा महामार्ग वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला. दरम्यान, पुणे- बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग चार दिवस बंद असल्याने अत्यावश्यक वस्तूंसह प्रवासीही खोळंबून राहिले होते.
पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात दाखल झाले आहेत. यावेळी पुणे बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्याने निर्माण झालेल्या समस्या आज स्थानिक नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रीय महामार्गावरील पुराचे पाणी निघून जाण्यासाठी अधिक कमानी केल्या जातील, असे आश्वासन दिले.याबाबत आपण आजच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.
अजित पवार यांनी आज पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा सुरू केला आहे. यावेळी त्यांनी शिरोळ तालुक्याची पाहणी केली. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर ,खासदार धैर्यशील माने त्यांच्या सोबत होते. त्यानंतर ते पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली या गावात आले होते. पंचगंगा नदीला पूर आल्याने पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग बंद केल्याने शिरोली गावात हजारो लोक अडकून पडले होते. वाहनांची प्रचंड रांग लागली होती. सोमवारी पुराचे पाणी उतरल्यानंतर वाहतुकीला काही प्रमाणात सुरुवात झाली.
या अडचणी स्थानिक नागरिकांनी अजित पवार यांच्यासमोर मांडल्या. “पंचगंगा नदीच्या पुलामुळे पाणी साचून राहते. ते पुढे सरकत नाही. यासाठी पुलाला अधिक कमानी करण्याची गरज आहे,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. महामार्ग बंद असल्याने चार-पाच दिवस नागरिकांना प्रवास करता आला नाही. डिझेल, पेट्रोलसह अत्यावश्यक सेवाही पुरवता आल्या नाहीत. मोठ्या गोंधळाला सामोरे जावे लागले.
दरम्यान, अजित पवार हे आपले निवेदन करत असतानाच उपस्थित नागरिक मध्ये बोलू लागले. त्यावर त्यांनी तुमच्या मताशी सहमत आहे, असे म्हणत काढता पाय घेतला.