पॅकेजचा खोटारडेपणा नाही; पण जबाबदारी पार पाडू

नुकसानीबाबत मी कोणतेही ‘पॅकेज’ जाहीर करणार नाही तसेच कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही.

उद्धव ठाकरे यांचे पूरग्रस्तांना आश्वासन

सांगली : मदतीच्या नावाखाली पॅकेजचा खोटारडेपणा करणार नाही, मात्र पूरग्रस्तांना वाऱ्यावरही सोडणार नाही. सरकार म्हणून जी जबाबदारी पार पाडावी लागेल ती पार पाडू. यासाठी काही कठोर निर्णय घेतले तर जनतेची साथ हवी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सांगलीतील पूरपाहणी दौऱ्यावेळी केले.

सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज पलूस तालुक्यातील अंकलखोप, भिलवडी, मिरज तालुक्यातील डिग्रज या गावांमध्ये जाऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी पूरग्रस्तांशी संवादही साधला. त्यांच्यासमवेत कृषी राज्यमंत्री डॉ .विश्वजित कदम, खा. धैर्यशील माने, आ. मोहनदादा कदम . आ. अनिल बाबर, आ. सुमन पाटील , आ. अरुण लाड, राज्याचे मुख्य सचिव  सीताराम कुंटे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोज लोहिया, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी आदी होते.

हे वाचले का?  LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…

ठाकरे म्हणाले, की करोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अतिवृष्टीचा अंदाज आला त्याच क्षणापासून प्रशासनाने काम सुरू केले. सांगली जिल्ह्यात सुमारे ४ लाख लोकांचे स्थलांतर झाले. लोकांचे जीव वाचविण्यास शासनाने प्रथम प्राधान्य दिले. अतिवृष्टी व पुरामुळे लोकांचे आर्थिक, शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेती, घरे-दारे, पशुधन यांचे एकूण किती नुकसान झाले याचा अंदाज घेणे सध्या सुरू असून काही ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता असून त्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील. त्याकरिता आपली साथ हवी.

हे वाचले का?  Prakash Ambedkar : राहुल गांधींवर टीका करताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली, अपशब्द वापरत म्हणाले, “ते आपल्याला..”

नुकसानीबाबत मी कोणतेही ‘पॅकेज’ जाहीर करणार नाही तसेच कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जे जे आपल्या हिताचे आहे ते सर्व प्रामाणिकपणे करणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपली जी निवेदने आहेत ती द्या, त्यातील सूचनांचा नक्कीच विचार केला जाईल. मंत्रीमंडळ बैठकीमध्ये यावर चर्चा होऊन निश्चिातच दिलासा देण्याचा प्रयत्न शासन करेल असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.