पैसे दामदुपटीच्या आमिषाने दोनशे कोटी रुपयांना फसवणूक, लासलगाव पोलिसांत गुन्हा

४० दिवसांत पैसे दामदुप्पट करण्याच्या आमिषाने लासलगावातील अनेक नागरिकांची सुमारे २०० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली.

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : ४० दिवसांत पैसे दामदुप्पट करण्याच्या आमिषाने लासलगावातील अनेक नागरिकांना सुमारे २०० कोटी रुपयांना फसवून स्टार इन्स्पायर ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संचालक फरार झाला आहे.

सोमनाथ गांगुर्डे यांच्या तक्रारीवरुन स्टार इन्स्पायर ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सतीश काळे, योगेश काळे (रा. टाकळी विंचूर) यांच्याविरुद्ध ५० लाख ८६ हजार रुपयांना फसविल्याप्रकरणी लासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ४० दिवसात पैसे दुप्पट आणि दुचाकी मोफत तर, १० लाखाच्या गुंतवणुकीवर ४० दिवसात पैसे दुप्पट आणि चारचाकी मोफत, असे आमिष दाखवत कंपनी संचालकांनी दलालांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची माया जमवली. आठ ते नऊ महिन्यांपूर्वी स्टार इन्स्पायर ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरु करण्यात आली होती. नागरिकांना जाळ्यात ओढल्यानंतर जवळपास २०० कोटी रुपयांची माया जमवून सतीश काळे, योगेश काळे हे पसार झाले.

हे वाचले का?  महामार्ग काँक्रिटीकरणासाठी नाशिक शहरातील वाहतुकीवर निर्बंध

काही राजकीय पुढाऱ्यांसह व्यापारी, संस्था, महिला, बँक कर्मचारी, शिक्षक तसेच काही मंदिरांच्या विश्वस्तांनीही या कंपनीत पैसे गुंतविल्याचे उघड होत आहे. यापूर्वीही याच संस्था चालकाकडून फसवणूक करण्यात आली होती. अनेक छोट्या गुंतवणूकदारांनी स्वतःचे दागिने गहाण ठेवून, मोडून, स्वतःच्या घरावर कर्ज काढून तर काहींनी नातेवाईकांकडून पैसे आणत योजनेच्या माध्यमातून कंपनीमध्ये गुंतविले आहेत. फसवणूक झाल्याचे लोकांच्या लक्षात आल्याने मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे. लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

हे वाचले का?  नाशिक: नियमबाह्य कामे केल्यास कारवाई; विभागीय सचिवांचा मुख्याध्यापक, प्राचार्यांना इशारा