पोलिसांचे सर्व विषय प्राधान्याने सोडविणार- मुख्यमंत्री

खुल्या सभागृहातील कार्यक्रमात शेकडो पोलीस अधिकारी प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते

नाशिक : प्रशिक्षणार्थीच्या वैद्यकीय विम्यातील अडचणी, पोलिसांचा बढत्यांचा प्रश्न, प्रबोधिनीत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासाठी अतिरिक्त निधी, प्रशिक्षकांना एकसमान भत्ता असे पोलीस दल आणि प्रशिक्षण संस्थेशी संबंधित विषय शासन प्राधान्यक्रमाने मार्गी लावणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे दिली.

येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत उभारण्यात आलेली ‘इनडोअर फायरिंग रेंज’, सिंथेटिक ट्रॅक, अ‍ॅस्ट्रो टर्फ फुटबॉल आणि हॉकी मैदान, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल मैदानासह नैसर्गिक जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन सोमवारी ठाकरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या राजकीय टोलेबाजीने वेगळेच रंग भरले. गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असून पोलीस अधिकाऱ्यांना माहिती तंत्रज्ञानासह नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण गरजेचे असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले. प्रशिक्षण काळात मनस्वास्थ्य जपणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने पोलीस प्रबोधिनीतील निसर्गरम्य परिसरात उत्तम सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. अशा वातावरणात प्रशिक्षण घेणारे अधिकारी राज्यातील नागरिकांचे रक्षण करतील.  अधिकारी-कर्मचाऱ्यांना काम करण्यास उत्साह वाटेल या पद्धतीने पोलीस ठाणी अद्ययावत करण्याकडे लक्ष दिला जात आहे.

हे वाचले का?  नाशिकमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रम

महाराष्ट्र पोलीस दलाने संघभावना कायम राखत देशात लौकिक प्रस्थापित केला आहे. पोलीस दलातील खेळाडूं्मध्ये राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी करण्याची क्षमता आहे. त्यांच्या जिद्दीला दिशा देऊन पाठबळ देणे शासनाचे कर्तव्य असल्याचे सांगितले.

प्रथमच मुखपट्टीविना जाहीर कार्यक्रम

खुल्या सभागृहातील कार्यक्रमात शेकडो पोलीस अधिकारी प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमात करोनाच्या नियमावलीचे पालन करण्यात आले होते. त्याचा संदर्भ देऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपण बऱ्याच दिवसांतून प्रथमच मुखपट्टी काढून मोकळ्या वातावरणात संवाद साधत असल्याचे नमूद केले.

हे वाचले का?  नाशिक : प्रलंबित मागण्यांसाठी आरक्षण बचाव समितीचा मोर्चा