प्रसिद्ध कवयित्री सुगथाकुमारी कालवश

‘सुगथा टीचर’ नावाने त्या लोकप्रिय होत्या.

प्रसिद्ध मल्याळी कवयित्री आणि कार्यकर्त्यां सुगथाकुमारी (वय ८६) यांचा करोनावरील उपचारादरम्यान मृत्यू झाला.

‘सुगथा टीचर’ नावाने त्या लोकप्रिय होत्या. त्यांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले होते. २१ डिसेंबर रोजी त्यांना करोना संसर्ग झाला होता. त्यांना आधी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. चाचणीतून त्या करोनाबाधित असल्याचे समोर आल्यानंतर त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या औषधाला प्रतिसाद देत नव्हत्या. नंतर त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. त्यांना ‘ब्राँकिअल न्यूमोनिया’ही झाला होता. करोनापश्चात न्यूमोनियाने त्यांची प्रकृती आणखी गंभीर बनली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

हे वाचले का?  Jammu and Kashmir Exit Polls 2024: जम्मू-काश्मीरमध्ये भरघोस मतदान, आता सत्ता कुणाची? Exit Poll कधी येणार?

मल्याळम भाषेत समकालीन काळातील त्या प्रसिद्ध कवयित्री होत्या. सुगथाकुमारी या सहवेदना, मानवी संवेदनशीलता व तात्त्विक बैठक असलेल्या कविता करीत असत. महिलांना मिळणारी वाईट वागणूक व निसर्गाचा मानवाकडून सुरू असलेला ऱ्हास याविरोधात त्यांनी सहा दशके लढा दिला. पर्यावरण व निसर्ग संवर्धनाच्या मुद्दय़ावर त्यांनी अनेक चळवळींचे नेतृत्व केले होते.

पश्चिम घाटातील सायलेंट व्हॅलीत जलविद्युत प्रकल्प उभारण्यास विरोध करणाऱ्या आंदोलनात त्या आघाडीवर होत्या. अरणमुला येथील विमानतळाविरोधातील आंदोलनातही त्या सहभागही होत्या. परित्यक्ता महिला व अत्याचारग्रस्त महिलांचा त्या आधार होत्या. त्यांनी तीन दशके ‘अभया’ ही संस्था महिलांसाठी चालवली.

हे वाचले का?  Adventure Tourism Meet (ATM) 2024: भारतात साहसी पर्यटनाला प्रोत्साहन आणि संधी!

मुथचिपिकल हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९६० च्या सुमारास प्रसिद्ध झाला. पथीरापुक्कल, कृष्णकवीथकल, रात्रीमाझा, अंबलमणी, राधा एविदे, थुलावर्षांपाचा हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध होते. केरळ राज्य महिला आयोगाच्या त्या पहिल्या अध्यक्षा होत्या. त्यांना २००६ मध्ये पद्मश्री सन्मान देण्यात आला, तर २०१३ मध्ये मनालेझूठ या काव्यसंग्रहासाठी सरस्वती सन्मानही देण्यात आला होता.

हे वाचले का?  Crime News : ट्यूशनवरुन घरी पतरणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, बेशुद्धावस्थेत सापडली मुलगी, कुठे घडली घटना?