महिंद्रा कंपनीचा पुढाकार
महिंद्रा कंपनीचा पुढाकार
नाशिक : प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत असताना त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे आव्हान पेलणे जिकिरीचे ठरत आहे. महानगरपालिकेच्या प्लास्टिक प्रक्रिया केंद्रात तयार होणारे ऑइल महिंद्रा कंपनी भट्टीत वापरते. या ऑइलवर प्रक्रिया करून डिझेल म्हणून त्याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्याचा महिंद्राचा मानस आहे.
गोदावरी नदीच्या संवर्धनासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीची बैठक ऑनलाइन पद्धतीने झाली. त्या वेळी प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट यावर चर्चा झाली. महापालिकेच्या खत प्रकल्पात प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. दैनंदिन एक टन क्षमतेचा हा प्रकल्प असून त्यातून निम्मे म्हणजे जवळपास ५०० लिटर ऑइल उपलब्ध होत असल्याचे यांत्रिकी विभागाचे प्रमुख बाजीराव माळी यांनी सांगितले. या प्रक्रियेसाठी शुद्ध प्लास्टिकची गरज असते. यामुळे जसे ते कचऱ्याच्या माध्यमातून उपलब्ध होते, तशी त्यावर प्रक्रिया केली जाते. यापासून तयार होणारे ऑइल महिंद्रा कंपनी भट्टीत वापरण्यासाठी उपयोगात आणते. या ऑइलमध्ये इंधनाचे काही घटक असून त्यावर संशोधन, प्रक्रिया करून ते इंधन म्हणून वापरण्याचा प्रयत्न होत आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बैठकीत तोच मुद्दा अधोरेखित केला. प्लास्टिक निर्मूलनासंदर्भात नाशिक महापालिकेची शास्त्रीय पद्धत अधिक चांगली आहे. सद्य:स्थितीत महिंद्रा कंपनी महापालिकेच्या प्लास्टिक प्रक्रिया केंद्रात तयार झालेले ऑइल आपल्या भट्टीत वापरते. तसेच प्लास्टिकपासून डिझेलदेखील तयार केले जाते. हे डिझेल महिंद्रा कंपनीबरोबर प्रायोगिक तत्त्वावर वापरले जाणार आहे. त्या अनुषंगाने महिंद्रा कंपनीशी चर्चा झाल्याचे गमे यांनी सांगितले. प्लास्टिकचा इंधन म्हणून वापरण्याचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास वाढत्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे सुकर होण्याची शक्यता आहे.
प्लास्टिक कचरा प्रक्रियेसाठी मालेगावच्या उद्योगांना देणार
मालेगाव येथे प्लास्टिकपासून विविध वस्तू बनविणारे उद्योग मोठय़ा प्रमाणात आहेत. प्लास्टिक कचरा या उद्योगांना प्रक्रियेसाठी देता येईल, याकडे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी लक्ष वेधले. प्लास्टिक कचऱ्याच्या वाहतुकीचा खर्च महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देण्यास तयार आहे. त्यामुळे प्रक्रियेसाठी प्लास्टिक जमा करून मालेगाव महापालिकडे देता येईल, असे मांढरे यांनी सुचविले. यावर विभागीय आयुक्त गमे यांनी मनमाड आणि मालेगावमधील प्लास्टिक कचरा मालेगाव महापालिके कडे पाठविता येईल, असे सूचित केले.