फटाक्यांपेक्षा आरोग्य महत्त्वाचे! नियमांचे कठोर पालन करण्याचे एनजीटीचे निर्देश

आरोग्याची जोखीम पत्करू आनंदोत्सव साजरा केला जाऊ शकत नाही, असे लवादाने नमूद केले आहे.

नवी दिल्ली : फटाक्यांबाबत सर्वोच्च न्यायालय तसेच ‘एनजीटी’च्या मुख्य खंडपीठाने घालून दिलेले नियम आणि निर्देशांचे कठोर पालन करण्यात यावे, अशी  सूचना राष्ट्रीय हरित लवादाच्या भोपाळ शाखेने अलीकडेच केली आहे. आरोग्याची जोखीम पत्करू आनंदोत्सव साजरा केला जाऊ शकत नाही, असे लवादाने नमूद केले आहे.

आनंदोत्सव साजरा करण्याच्या नावाखाली इतरांच्या (विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि मुले) आरोग्याच्या हक्कावर गदा आणण्याची परवानगी कुणालाही दिली जाऊ शकत नाही, असेही ‘एनजीटी’ने प्रामुख्याने म्हटले आहे.       

हे वाचले का?  AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी

भारतीय घटनेने अनुच्छेद २१ नुसार बहाल केलेल्या आरोग्याबाबतच्या मूलभूत अधिकारावर जल्लोष करण्याच्या नावाखाली कुणालाही अतिक्रमण करण्यास मान्यता दिली जाऊ नये, असे ‘एनजीटी-भोपाळ’चे न्यायिक सदस्य न्यायाधीश शिवकुमार सिंह आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. अफरोझ अहमद यांनी स्पष्ट केले. डॉ. पी. जी. नाजपांडे आणि अन्य विरुद्ध मध्य प्रदेश सरकार या खटल्याच्या सुनावणीत ‘एनजीटी’ने वरील सूचना केली आहे. 

त्याचवेळी, फटाक्यांवर सरसकट बंदी घालण्यात आलेली नाही, तर केवळ नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असलेल्या फटाक्यांवरच बंदी असल्याचे या आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे. उत्सव साजरा करण्याच्या नावाखाली कोणत्याही बंदी घातलेल्या फटाक्यांच्या वापरास परवानगी देऊ नये असे लवादाने अधिकाऱ्यांना बजावले. फटाक्यांवरील निर्बंधांसंबधी सर्वोच्च न्यायालयाच्या २०१८च्या निर्देशांनंतर त्यासंबंधी २०२१मध्ये मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. मात्र, मध्य प्रदेशात या सूचनांचे पालन करण्यात आले नव्हते. त्यानंतर हे प्रकरण एनजीटीपुढे सुनावणीसाठी आले. आता या प्रकरणी पुढील सुनावणी ८ नोव्हेंबरला होणार आहे.

हे वाचले का?  Hardik Pandya : हार्दिकने मोडला विराटचा खास विक्रम! भारतासाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू