“फाळणीइतकीच या बेटांकडे बघूनही वेदनेची कळ येणे आवश्यक”, शिवसेनेनं करून दिली आठवण!

देशात फाळणी वेदना स्मृती दिन पाळण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना अप्रत्यक्षपणे खोचक शब्दांत गोव्यातील परिस्थिती सांगितली आहे.

देशभरात १४ ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याची घोषणा नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी केलेल्या भाषणात देखील याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना शिवसेनेनं या निर्णयावरून पंतप्रधान आणि केंद्र सरकारलाही खडे बोल सुनावले आहेत. एकीकडे ‘मोदींनी जुन्या वेदनेची खपली उचकटून काढली’, अशा शब्दांत सुनावल्यानंतर आता शिवसेनेनं गोव्यासह देशभरातील काही ठिकाणांचा दाखला देत त्यांच्याकडे बघूनही फाळणीइतकीच वेदनेची कळ येणं आवश्यक आहे, अशी खोचक शब्दांत आठवण करून दिली आहे.

“त्या धुंद नशेत ते देश, तिरंगा विसरले आहेत”

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून गोव्याजवळच्या साओ जॅसिंटो बेटावर स्वातंत्र्यदिनी निर्माण झालेल्या परिस्थितीवर कठोर शब्दांमध्ये टीका करण्यात आली आहे. “गोव्याच्या समुद्रात नांगरून पडलेले हे ‘कॅसिनो’ म्हणजे स्वतंत्र साओ जॅसिंटो बेटेच आहेत. त्या बेटांवर बाहेरच्यांना पाय ठेवता येत नाही. पण या जुगारी बेटांवर फक्त बाहेरच्याच लोकांची वर्दळ आहे व त्या धुंद नशेत ते देश, तिरंगा या सगळ्यांना विसरले आहेत. देशात फक्त असे एकच साओ जॅसिंटो बेट नाही. गोव्यात व देशात अशी बेटे अनेक आहेत. फाळणीइतकीच या बेटांकडे बघूनही वेदनेची कळ येणं आवश्यक आहे”, अशा शब्दांत सामनामधून टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

हे वाचले का?  Manoj Jarange : “बेगडी उपोषण करण्यापेक्षा…”, आंदोलन स्थगित करताना मनोज जरांगे असं का म्हणाले?

तिरंगा फडकावण्याचा वाद..

स्वातंत्र्यदिनी गोव्याजवळच्या साओ जॅसिंटो बेटावर स्थानिकांनी नौदलाला तिरंगा फडकावण्याला विरोध केला. या मुद्द्यावरून वातावरण तापल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ध्वजारोहण होणारच असं ठणकावून सांगितल्यानंतर अखेर या बेटावर ध्वजारोहण झालं. त्या मुद्द्यावरून आता देशभर चर्चा सुरू झाली आहे. “गोव्यातील काही मंडळी आजही त्यांचा बाप गोव्यात नसून पोर्तुगालात असल्याच्या थाटात वावरत असतात. गोव्यातील झुआरी नदीच्या तटावर हे बेट वसलेलं आहे. गोव्यात असूनही असंख्य गोवेकर या बेटावर अद्याप पाय ठेऊ शकलेले नाहीत. कारण येथील लोक बाहेरच्या लोकांना पाय ठेऊ देत नाहीत”, असं सामनाच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

हे वाचले का?  Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

“गोव्यात अशा अनेक वस्त्या आणि बेटे आहेत जिथे ड्रग्ज माफियांचा कारभार चालतो. त्यांचेच सरकार अस्तित्वात आहे. नायजेरिया आणि रशियाचे झेंडे फडकत आहेत. तिथे स्थानिक पोलिसही पाय ठेवायला धजावत नाहीत. कॅसिनो म्हणजे जुगाराचे अड्डे गोव्याच्या समुद्रात नांगरून पडले आहेत. त्यांचा गोव्याच्या मंगल संस्कृतीशी काय संबंध आहे? हे अड्डे सरकार आणि राजकारण्यांचे खिसे गरम करत असतील, पण गोवा नासवून सोडत आहेत. गोव्याच्या समुद्रात नांगरून पडलेले हे कॅसिनो म्हणजे स्वतंत्र साओ जॅसिंटो बेटेच आहेत. गोव्यात आणि देशात अशी अनेक बेटे आहेत”, अशा शब्दांत या मुद्द्यावर भूमिका मांडण्यात आली आहे.