‘फॉक्सकॉन’चा प्रकल्प गुजरातकडे ;महाराष्ट्राला चकवा : १ लाख ६६ हजार कोटींची गुंतवणूक गमावल्याने सत्ताधारी लक्ष्य

महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांत समूहाने प्रकल्पाबाबत महाराष्ट्राशी चर्चा सुरू केली होती.

मुंबई : ‘वेदांत समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आता गुजरातकडे वळली आहे. या गुंतवणुकीसाठी गुजरातची निवड केल्याचे वेदांत समूहाने जाहीर केले असून, या प्रकल्पामुळे उभे राहणारे पूरक छोटे उद्योग, लाखोंचा रोजगार, शेकडो कोटींच्या कर महसुलास महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचे अपयश असल्याची टीका विरोधकांनी केली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांत समूहाने प्रकल्पाबाबत महाराष्ट्राशी चर्चा सुरू केली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात ‘वेदांत ग्रुप’ आणि ‘फॉक्सकॉन’ कंपनीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. वेदांतने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीशी भागीदारी केली असून, या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित होते. यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले डिस्प्ले फॅब्रिकेशन, ६३ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सेमीकंडक्टर्स तसेच ३८०० कोटी रुपयांचा चाचणी प्रकल्प यांचा समावेश आहे. याबाबत ‘एमआयडीसी’शी प्राथमिक चर्चा सुरू होती. पश्चिम महाराष्ट्रात तळेगाव तर विदर्भात बुटीबोरीच्या जागेचा पर्याय देण्यात आला. या प्रकल्पांमधून सुमारे २ लाख जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असे बैठकीतील सादरीकरणावेळी सांगण्यात आले होते.

हे वाचले का?  Nair Hospital Molestation : “नायरची वाटचाल कोलकाताच्या दिशेने”, लैंगिक छळाच्या तक्रारींवरून मनसेचा सरकारला सूचक इशारा!

हा उद्योग महाराष्ट्रात यावा यासाठी केंद्र शासनातर्फे लागणारे सहकार्यही घेण्यात येणार आहे, असे सांगत सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. मात्र, मंगळवारी वेदांत समूहाने आपला प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले आणि महाराष्ट्राकडे येऊ घातलेला आणखी एक प्रकल्प गुजरातकडे गेल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकल्पासाठी गुजरात सरकारने १ हजार एकर जमीन विनाशुल्क देऊ केली आहे. तसेच वीज व पाणी सवलतीच्या दरात आणि तेही २० वर्षांसाठी एकाच दराने देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

फडणवीस यांचे प्रयत्न अयशस्वी

फॉक्सकॉनची गुंतवणूक महाराष्ट्रात यावी, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील होते. पण, गुजरातच्या महाशक्तीपुढे त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. यापूर्वीही २०१४ ते २०१९ या काळात मुख्यमंत्री असताना फॉक्सकॉनची अ‍ॅपल कंपनीशी निगडीत गुंतवणूक महाराष्ट्रात यावी, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले होते. पण, त्यावेळी त्यांना यश आले नव्हते. याबाबत फडणवीस यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.

महाराष्ट्राला दगा

फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला वळविण्यात आला, हा शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्राला दिलेला दगा असल्याची टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली. ‘‘स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्राला धोके देणारे हे सरकार आहे. तळेगावमध्ये प्रकल्प उभारण्यात वेदांत-फॉक्सकॉनने रस दाखवला होता. जूनपर्यंत हा प्रकल्प महाराष्ट्रात होता. जुलैमध्ये नवीन सरकारबरोबर बैठक झाल्यानंतर आता मात्र हा प्रकल्प गुजरातला गेल्याने हे शिंदे-फडणवीस सरकारचे मोठे अपयश आहे’’, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

हे वाचले का?  Maharashtra News Live: ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेच्या वडिलांची राज्य सरकारवर टीका; म्हणाले, “त्याला पाच कोटी आणि…”

राज्याचा घास हिरावला

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना राजकीय सभांतून वेळ मिळत नसल्याने पुन्हा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. गुजरातची निवडणूक तोंडावर आल्याने महाराष्ट्रातील भाजप गुजरातचे हित जपण्यात व्यग्र असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल राज्यातील सुशिक्षित, बेरोजगार तरुणांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माफी मागतील का? असा सवालही पाटील यांनी केला.

महाविकास आघाडी सरकारने योग्य प्रतिसाद दिला नाही

महाविकास आघाडी सरकारने फॉक्सकॉन समूहाबरोबर गेल्या सात महिन्यांमध्ये घेतलेल्या बैठकांमध्ये योग्य प्रतिसाद व प्रोत्साहन न दिल्याने हा प्रकल्प गुजरातला गेला. हा प्रकल्प गुजरातला का गेला, याबाबतच्या कारणांवर विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे योग्य तो निर्णय घेतील, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

तुम्ही गुजरातपेक्षा चांगले पॅकेज का दिले नाही?’

हे वाचले का?  Sujat Ambedkar on Raj Thackeray : “राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम…”, सुजात आंबेडकरांचं मोठं विधान; म्हणाले, “जोपर्यंत मुस्लिमांचे…”

फॉक्सकॉन- वेदांत प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याबद्दल कंठशोष करताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुजरातपेक्षा चांगले पॅकेज देण्यात कमी का पडलो, याचे उत्तर आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांनी आधी द्यावे, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. गुजरातने अधिक चांगले पॅकेज दिल्याने आम्ही तेथे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे, असे फॉक्सकॉन- वेदांतने सांगितले होत़े  त्यावर आम्ही लगेच त्यांच्याशी संपर्क साधून अधिक चांगले पॅकेज देऊ केले. त्यांनी आमच्याशी चर्चाही केली. भरपूर प्रयत्न करूनही त्यांनी गुजरातमधील गुंतवणुकीच्या निर्णयावर ठाम राहण्याचे ठरविले, असे सामंत म्हणाले. आता तरी त्यापेक्षा दुपटीहून अधिक गुंतवणूक असलेल्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या गुंतवणुकीत खोडा घालू नये, असे आवाहनही सामंत यांनी विरोधकांना केले.