बँक ऑफ इंडियाकडून घरांसाठी कर्ज स्वस्त, प्रक्रिया शुल्कही माफ; सवलतीतील ८.३ टक्के व्याजदराचा लाभ मात्र ३१ मार्चपर्यंतच!

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने मंगळवारी नव्याने गृह कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी व्याजाचे दर ८.४५ टक्क्यांवरून ८.३ टक्क्यांपर्यंत कमी करत असल्याची घोषणा केली.

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने मंगळवारी नव्याने गृह कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी व्याजाचे दर ८.४५ टक्क्यांवरून ८.३ टक्क्यांपर्यंत कमी करत असल्याची घोषणा केली. महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजे ३१ मार्चच्या मर्यादित कालावधीसाठी हा व्याजदर लागू असेल आणि बँकेने प्रक्रिया शुल्कही पूर्णपणे माफ केले आहे. ८.३ टक्के हा सध्या घरासाठी कर्जाचा प्रचलित सर्वात कमी व्याजदर असल्याचा बँकेने दावा केला आहे. दरम्यान बँक अग्रणी स्टेट बँक आणि खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेनेही ८.४ टक्के व्याजदरापासून सुरू होणारी गृह कर्ज योजना आणल्या आहेत. या बँकांचेही हे सवलतीतील व्याजदर ३१ मार्चपर्यंत वैध आहेत.

हे वाचले का?  Jhansi Fire: झाशीमध्ये हाहाकार! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू, योगी आदित्यनाथांकडून शोक व्यक्त

बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या ८.३ टक्के दराने गृह कर्ज ३० वर्षांच्या मुदतीसाठी घेतल्यास, कर्जदाराला दरमहा भरावा लागणारा हप्ता (ईएमआय) प्रति लाख रुपयांमागे ७५५ रुपये असा असेल. शिवाय बँकेने ओव्हरड्राफ्ट सुविधेसह कर्जाची व्याप्ती आणखी वाढवली आहे. घर खरेदीदारांना घराचे आवश्यक बांधकाम, नूतनीकरण आणि फर्निचरची खरेदीही करता येईल. तर अक्षय्य ऊर्जा पर्यायांच्या वापरांना प्रोत्साहन म्हणून बँकेने छतावरील सौर वीज यंत्रणेसाठी ७ टक्के व्याज दराने आणि प्रक्रिया शुल्काशिवाय विशेष वित्तपुरवठा करणारी योजना आणली आहे. यासाठी १० लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य बँकेकडून दिले जाईल आणि १२० महिन्यांच्या कमाल परतफेडीच्या कालावधीसह प्रकल्प खर्चाच्या ९५ टक्क्यांपर्यंत वित्तपुरवठा केला जाईल. ग्राहकाला यातून ७८,००० रुपयांपर्यंतच्या सरकारी अनुदानाचा फायदा घेण्यासाठी थेट दावाही करता येईल.

हे वाचले का?  ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी क्रीडा संकुलासाठी अखेर २५.७५ कोटींचा निधी मंजूर