बगे यांचे लेखन लय आणि नादमय;महेश एलकुंचवार यांचे प्रतिपादन, जनस्थान पुरस्कार प्रदान

आशाताई बगे यांना संगीताची उत्तम जाण असल्याने त्यांची पुस्तके बोलतात.

नाशिक : आशाताई बगे यांना संगीताची उत्तम जाण असल्याने त्यांची पुस्तके बोलतात. त्यांच्या लेखनाला एक प्रकारची लय आणि नाद आहे. सृजनशील, खोल, तरल असे त्यांचे लेखन आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी शुक्रवारी केले.

येथील महाकवी कालिदास कलामंदिरात साहित्य क्षेत्राचा मानिबदू असलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे एक वर्षांआड देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्काराने ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना सन्मानित करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एलकुंचवार यांनी आशा बगे यांच्या लेखनाचे तसेच व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडले. आशाताईंच्या लेखनाशी उशिरा परिचय झाला. जुने नागपूर त्यांच्या लेखनातून समोर येत गेले. सखोल अध्यात्मिक चिंतन हे त्यांच्या लेखनाचे अधिष्ठान आहे. त्यांचा ज्ञानेश्वरीचा गाढा अभ्यास आहे. लेखनाचे विविध प्रकार आणि कप्पे असतात. त्यापलिकडे जेव्हा लेखक जातो, तेव्हाच त्याचे लेखन शेवटपर्यंत वाचकाबरोबर राहते. आशाताई यांच्या लेखनाची या स्वरुपात कुंडली मांडता येणार नाही. त्यांचे लेखन वाचताना वाचकांना तयारी करावी लागते, असे एलकुंचवार म्हणाले.

हे वाचले का?  गणेशोत्सवातून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी; फलकबाजी, आरती संग्रह वितरण, ढोल-ताशा महोत्सव

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्या. चपळगावकर यांनी पारितोषिक गुणवत्तेने मिळते यावर विश्वास नाही परंतु, प्रतिष्ठानने आपली गुणवत्तेची परंपरा कायम जपल्याचे सांगितले. आशाताई यांचा सन्मान करताना आनंद वाटत आहे. गोष्ट मांडण्याची पद्धत असते, प्रकट होण्याची पद्धत असते. यातून नव्या कथा जन्माला येतात. साहित्य समृद्ध होत जाते, असे सांगत न्या. चपळगावकर यांनी बगे यांच्या लेखनातील निवडक पात्रांची माहिती दिली. सद्य:स्थितीत मराठी लघुकथांची दयनीय अवस्था असून ती पुन्हा जोरकस, समृद्ध व्हावी, यासाठी आशाताईंसारखे लेखन पुढे यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हे वाचले का?  Manoj Jarange Patil Rally : मनोज जरांगे यांच्या फेरीचा शांततेत समारोप

‘लेखन प्रवासात अनुभवलेल्या लोकांचा सन्मान’

पुरस्कार स्वीकारल्यानंतर आशा बगे यांनी आनंद व्यक्त केला. ‘‘हा पुरस्कार लेखनाचा नव्हे तर, लेखन प्रवासात अनुभवलेल्या लोकांचा आहे. सभोवतालच्या कोलाहलात लेखकाला आपला स्वर परजून ठेवावा लागतो. ते साहित्यिक, लेखकाचे काम आहे. जीवनातील अशा अमूल्य अनुभवाचा, आनंदाचा शोध लेखक घेत असतो. आनंदाचा स्वर ललित वाड्:मयाचा प्राणस्वर आहे. एका अनुपलब्धतेच्या वाटेवरून उपलब्धतेच्या वाटेवर हा प्रवास होत असतो. कुसुमाग्रज, कवी ग्रेस, आरती प्रभु, बोरकर, अनुराधा पाटील हे असाच आनंद शोधत माणूसपणाला जोडत राहतात. ईष्र्याविरहित प्रेम करू तेव्हा जगण्याचा आनंद घेता येईल,’’ असे बगे यांनी नमूद केले.

हे वाचले का?  चार धरणे तुडुंब, नऊमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक साठा, नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ५७ टक्क्यांवर.