बनावट कागदपत्रांद्वारे भूखंडांची परस्पर विक्री

मालकी हक्क नसतांना बनावट कागदपत्र आणि व्यक्ती उभी करून भूखंड परस्पर अनेकांना विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.

२९ जणांविरुध्द गुन्हा; बांधकाम व्यावसायिकांसह अनेक उच्चपदस्थांचा समावेश
नाशिक : मालकी हक्क नसतांना बनावट कागदपत्र आणि व्यक्ती उभी करून भूखंड परस्पर अनेकांना विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी २९ जणांविरूध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मोठय़ा बांधकाम व्यावसायिकांसह मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे यांच्या पत्नी स्वाती यांचा समावेश आहे.
दिपाली शिंदे (रा.शांतीपार्क जवळ,उपनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयित चंद्रशेखर अयाचित याने तक्रारदार महिलेचे वडील आणि अन्य सहा साक्षीदारांच्या नावे असलेली मिळकत सव्‍‌र्हे नं.७०२,१ अ क्षेत्र ० हेक्टर ६२ आरचे ०१ ते ३० या भूखंडाची २१ मार्च ते २५ मे २००५ या कालावधीत परस्पर दुय्यम निरीक्षक कार्यालयात बनावट कागदपत्र आणि बनावट व्यक्ती उभे करून खरेदी खत नोंदविले. त्यानंतर या भूखंडाची उर्वरीत संशयितांना विक्री करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी चंद्रशेखर अयाचित, रेखा सचान, कुणाल सचान, वेदिका सचान, दिलीपकुमार पटेल, अशोक भिडे, प्रतिभा भिडे, हितेशकुमार पटेल, मंदाकिनी केदार, समिर केदार, गिरीश केदार, शामराव केदार, गोवर्धनभाई पटेल, गंगाराम पटेल, पोपटलाल पटेल, महावीर चोपडा, रवींद्र पवार, अजय पवार, नरोत्तम पटेल, सुरेश कारे, स्वाती दवंगे, विजय सराफ, फारूक मोतीवाला, पर्ल मोतीवाला, फराक मोतीवाला, सहारा मोतीवाला, अकसाने मोतीवाला, अभिजीत भालेराव आणि श्रावण शेळके आदींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कशी झाली फसवणूक ?
दिपाली शिंदे यांचे वडील अनिल उर्फ अशोक भालेराव तसेच भगवान सोनवणे, कारभारी सोनवणे, तुळशीराम सोनवणे, दिलीप भालेराव, सुनील भालेराव, अविनाश भालेराव, चंद्रशेखर अयाचित यांच्या गंगापूर रोडवरील सव्‍‌र्हे नं. ७०२ परिसरात मिळकती आहेत. यातील अनिल भालेराव यांचा मृत्यू झाला असून अयाचित वगळता अन्य लोक बाहेरगावी राहतात. याचा गैरफायदा घेत मुख्य संशयित चंद्रशेखर अयाचित यांच्यासह २९ जणांनी अयाचित यांच्याशी संगनमत करत ३० भूखंडांपैकी २५ भूखंड परस्पर विकले. करारनामा आणि मुखत्यारपत्रही तयार केले. शिंदे आणि अन्य चार साक्षीदार यांना कुठलाही दस्ताऐवज, मिळकतींचा मोबदला न देता त्यांच्याऐवजी बनावट व्यक्ती उभी करत खोटी स्वाक्षरी करुन खोटय़ा दस्ताऐवजांच्या आधारे भूखंडाची विक्री केली. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचले का?  नाशिक: नियमबाह्य कामे केल्यास कारवाई; विभागीय सचिवांचा मुख्याध्यापक, प्राचार्यांना इशारा