बससेवेचा एक जुलैचा मुहूर्त टळणार ?

बराच काळ वेगवेगळ्या कारणांमुळे रखडलेल्या मनपाच्या शहर बस सेवेचा १ जुलैचा मुहूर्त टळण्याची चिन्हे आहेत.

नऊ मार्गासह थांब्यांचा चालक-वाहकांना परिचयासाठी सराव

नाशिक : बराच काळ वेगवेगळ्या कारणांमुळे रखडलेल्या मनपाच्या शहर बस सेवेचा १ जुलैचा मुहूर्त टळण्याची चिन्हे आहेत. बस सेवा कार्यान्वित करण्यासाठी विविध पातळ्यांवर नियोजन केले जात आहे. त्याअंतर्गत मंगळवारी पहिल्या टप्प्यातील नऊ मार्ग आणि थांब्यांचा चालक-वाहकांना परिचय करून देण्यात आला. यानिमित्ताने मनपाच्या चकचकीत बस प्रथमच रस्त्यावर आल्याने सर्वसामान्यांना या सेवेविषयी उत्सुकता जाणवली, परंतु काही कामे पूर्ण न झाल्यामुळे निश्चित झालेला मुहूर्त तीन-चार दिवस लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

महापालिके च्या शहर बस सेवेचे घोंगडे भिजत राहिल्याने निर्बंध शिथिल होऊनही नागरिकांसमोरील प्रवासाची समस्या कायम आहे. मध्यंतरी आढावा घेऊन महापालिकेने १ जुलैपासून बस सेवा सुरू करण्याचे नियोजन केले. २७ ते ३० जून या कालावधीत शहर बस सेवेची चाचणी घेण्यात येणार आहे. बस सेवेच्या अनुषंगाने बांधकाम, गॅस, पुरवठा, भ्रमणध्वनी अ‍ॅप, मनुष्यबळ आदींची पूर्तता केली जात आहे. बस सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी जवळपास झाली आहे. तपोवन आणि नाशिक रोड येथील स्थानकाचे काम पूर्णत्वाकडे असल्याचे सांगितले जात होते. तथापि, यासंबंधी आवश्यक ती सर्व कामे विहित मुदतीत पूर्णत्वास जातील की नाही याबद्दल साशंकता आहे. मंगळवारी पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी तपोवन, नाशिक रोड या दोन्ही बस स्थानकांना भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. बस सेवेच्या एका मार्गाचे अवलोकन केले. पहिल्या टप्प्यात नऊ मार्गावर ५० बस धावणार आहेत. त्यासाठी प्रत्येकी १२५ वाहक, चालक आणि वाहन तपासणी तसेच अन्य कामांसाठी ५० असे एकूण ३०० जणांचे मनुष्यबळ नियुक्त केले जाणार आहे. नऊ मार्गावर एकूण २४० थांबे आहेत. या मार्गाचा तसेच थांब्यांचा चालक-वाहकांना परिचय करून देण्यासाठी तपोवन बस स्थानकावरून १० बसगाडय़ा सोडण्यात आल्या. तीन-चार फेऱ्या मारून चालक-वाहकांना मार्ग, थांबे यांचा परिचय करून देण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. बुधवारी नाशिक रोड स्थानकातून निघणाऱ्या गाडय़ांमुळे चालक-वाहकांना मार्गासह थांब्यांचा परिचय होईल. बस सेवेची चाचणी २७ ते ३० जून या कालावधीत करून १ जुलै रोजी प्रत्यक्षात बस सेवा सुरू करण्याचा महापालिकेचा प्रयत्न होता. तथापि, तयारी पूर्ण झाली नसल्याने हा मुहूर्त गाठणे अवघड झाले आहे. यात तीन-चार दिवसांचा बदल होऊ शकतो, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद केले.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग