बहुतांश ग्रामपंचायतीत युवावर्गास संधी

राजकीय घराण्यांचे वर्चस्व कायम; जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतीत चुरशीची निवडणूक

राजकीय घराण्यांचे वर्चस्व कायम; जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतीत चुरशीची निवडणूक

नाशिक : जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतीच्या अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत अनेक ठिकाणी युवावर्गास संधी देत मतदारांनी प्रस्थापितांना घरी बसवून परिवर्तन घडवले. मालेगावमध्ये कृषिमंत्री दादा भुसे यांचा प्रभाव कायम राहिला. मतदारांनी नवख्या तरुणांवर विश्वास दर्शविला असला तरी काही राजकीय घराण्यांनी आपापल्या गावांमधील वर्चस्व कायम असल्याचे सिद्ध केले. राष्ट्रवादीचे नेते तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात काही ठिकाणी त्यांचे समर्थक परस्परांविरोधात लढल्याने नुकसान झाले. इगतपुरीत काही ग्रामपंचायतींवर शिवसेना समर्थकांनी विजय मिळवला. नांदगाव आणि काही अन्य ठिकाणी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील गटांनी अस्तित्व कायम राखण्यात यश मिळवले. सटाण्यात भाजप

समर्थक गटांनी अनेक ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखले.

जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींत १७७८ प्रभागांत ४९११ जागांसाठी मतदान झाले होते. करोनाकाळातील पहिल्या निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान झाल्यामुळे सर्वाचे निकालाकडे लक्ष होते. सोमवारी सकाळी तालुकास्तरावर मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. दुपारनंतर हळूहळू निकाल जसे येऊ लागले तसा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटपाने विजयोत्सव साजरा होण्यास सुरुवात झाली. मतपेटीतून धक्कादायक निकाल समोर आले. अनेक ग्रामपंचायतीत सत्ताधारी गटास मतदारांनी घरी बसवले.

हे वाचले का?  देवळालीत तोफगोळ्याचा स्फोट, लष्कराकडून चौकशीचे आदेश

गावपातळीवरील ही निवडणूक पक्षाच्या झेंडय़ाखाली लढविली जात नाही. स्थानिक पातळीवर सर्वपक्षीय गट आकारास येतात. त्यामुळे ग्रामपंचायतींवर नेमके कोणाचे वर्चस्व राहिले, याचे सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे नेहमीप्रमाणे दावे सुरू झाले. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अंदरसूलची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न केले. परंतु दोन्ही गटांतील भुजबळ समर्थक अडून राहिले. निकालात तीन जागांवर अपक्षांनी बाजी मारल्याने येथे त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. पाटोदा ग्रामपंचायतीत भुजबळ समर्थक गटाची सत्ता आली. परंतु खंदा समर्थक साहेबराव आहेर हे पराभूत झाले. या ग्रामपंचायतीत शिवसेनेचे तालुकाप्रमुख रतन बोरनारे यांनाही पराभवाचे धनी व्हावे लागले. नगरसूलमध्ये परिवर्तन झाले. मुखेड ग्रामपंचायतीत काँग्रेस गटाचे वर्चस्व राहिले. भुजबळ समर्थक बाळासाहेब गुंड आणि अन्य पदाधिकारी पराभूत झाले.

हे वाचले का?  आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर

नांदगाव तालुक्यात प्रतिष्ठेच्या झालेल्या न्यायडोंगरी ग्रामपंचायतीत काँग्रेसचे माजी आमदार अनिल आहेर यांच्या परिवर्तन पॅनलने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करीत १७ पैकी तब्बल १२ जागांवर विजय मिळविला. शिवसेनेच्या पॅनलला अवघ्या दोन जागा मिळाल्या. ही निवडणूक खऱ्या अर्थाने भावकीची निवडणूक ठरली होती. माजी आमदार अनिल आहेर आणि पंचायत समितीचे माजी सभापती विलास आहेर या दोघा चुलतभावांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. इगतपुरी तालुक्यात प्रस्थापितांना धक्का बसला. आठपैकी पाच ग्रामपंचायतीत शिवसेनेने मुसंडी मारली. ५५ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाली होती.

बागलाण तालुक्यात ब्राह्मणगाव, नामपूर, ताहराबाद, श्रीपुरवडे, करंजाळ, यशवंतनगर, ठेंगोडा, द्याने ग्रामपंचायतीत भाजपच्या गटाने बाजी मारली. लखमापूर ग्रामपंचायतीत भाजप-राष्ट्रवादीची युती असूनही शिवसेनेने विजय मिळवला. देवळा तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अनेक जागांवर बिनविरोध निवडणूक झाली होती. उर्वरित जागांवर संमिश्र निकाल लागले.

गोंधळ घालणाऱ्यांना काठीचा प्रसाद

हे वाचले का?  दिवाळीत भेसळ रोखण्यासाठी, अन्न औषध प्रशासन विभाग सज्ज

नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतीची मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार कार्यालयात झाली. या वेळी एका ग्रामपंचायतीच्या निकालावरून विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. यामुळे गोंधळ उडाला. पोलिसांनी धाव घेऊन दोन्ही गटांच्या समर्थकांना काठय़ांचा प्रसाद देऊन पिटाळले. अकस्मात घडलेल्या या प्रकाराने मतमोजणी केंद्राबाहेर धावपळ उडाली. निकाल जाणून घेण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर मोठी गर्दी उसळली होती. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावरील वाहतूक प्रभावित झाली.