“बारामतीचा सस्पेन्स थोडा राहू देत, जे नाव तुमच्या मनात..”, अजित पवारांचं सूचक वक्तव्य

बारामतीत कोण लढणार यावर वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत, २८ तारखेला तुम्हाला सगळं कळेल असं अजित पवार म्हणाले आहेत.

मध्यंतरी देवेंद्र फडणवीस आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की जागावाटपाचं काम ८० टक्के पूर्ण झालं आहे. आज मी तुम्हाला सांगतोय लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचं काम ९९ टक्के पूर्ण झालं आहे. मी, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संयुक्त पत्रकार परिषद घेऊ आणि सगळ्या जागा जाहीर करु अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांना दिली. तसंच शिवाजी राव अढळराव पाटील यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर बारामती लोकसभेच्या जागेबाबतही महत्त्वाचं वक्तव्य केलं. निवडणूक प्रमुख ही जबाबदारी धनंजय मुंडेंवर आम्ही दिली आहे. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मागे रहायाचं नाही ही आमची भूमिका आहे असंही अजित पवार म्हणाले.

हे वाचले का?  ”शरद पवारांनी मराठा समाजाचे वाटोळे केले”; मनोज जरांगेंचं टीकास्र; म्हणाले, ”त्यांना जमलं नाही म्हणून…”

काय म्हणाले अजित पवार?

“पाच वर्षांपूर्वी निवडणुका झाल्या तेव्हा लोकसभेच्या ४८ जागा होत्या. त्यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस युतीत लढले आणि महाविकास आघाडी म्हणून लढलो होतो. कारण नसताना आम्हाला तीनच जागा मिळतील वगैरे गैरसमज पसरवले गेले. २३ आणि १८ जागा भाजपा आणि शिवसेनेने २०१९ ला जिंकल्या होत्या. त्यानंतर आमची चर्चा झाली आहे. अंतिम घोषणा आम्ही २८ मार्चला करणार आहोत आणि जागा जाहीर करणार आहोत.” अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.

महायुतीत कुठलेही गैरसमज नाहीत

“जागावाटपाच्या संदर्भात वेगवेगळे अंदाज काही पत्रकारांनी चालवले. आम्हाला तीनच जागा देतील वगैरे सांगितलं. मतभेद झाल्याचं सांगितलं. मात्र आमच्यात तसे कुठलेही मतभेद नाहीत. आम्ही एकत्र बसून पर्याय काढला. दोन्ही मित्र पक्षांनी सहकार्याची भूमिका घेतली. २८ मार्चला संध्याकाळी आम्ही जागावाटप जाहीर करणार आहोत. आमच्या मंत्र्यांवर आम्ही लोकसभा निवडणुकीची जबाबदारी टाकली आहे. जिथे राष्ट्रवादीचा उमेदवार नाही पण महायुतीचा उमेदवार आहे तिथे जबाबदारी घेऊनच प्रचार करायचा आहे” असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

हे वाचले का?  मोदी यांच्या सभेस चार उमेदवार अनुपस्थित; देवळालीतील सरोज अहिरे व्यासपीठावर, शिंदे गटाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

बारामती बाबत काय म्हणाले अजित पवार?

“रायगडची जागा आज आम्ही जाहीर केली आहे. रायगडमधून सुनील तटकरे निवडणूक लढवतील. शिरुरची जागा काही वेळात जाहीर करणार आहोत. बारामतीचा थोडा सस्पेन्स राहू देत. काळजी करु नका २८ मार्चला मी काय ठरलंय ते सांगतो. तुमच्या मनात जे नाव आहे तेच नाव तिथे येणार आहे.” असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.

हे वाचले का?  कोकणात माकडांचा उपद्रव वाढला; ३५ लाख खर्च करुन वन विभाग माकडे पकडण्याची मोहीम हाती घेणार

विजय शिवतारे जे काही बोलले त्याबद्दल मी काहीही भाष्य करणार नाही. माझं कुणावर काहीही ऑबजेक्शन नाही. कुणीही काहीही बोलावं. मी विकासाचं राजकारण करतो आहे. असं म्हणत विजय शिवतारेंवर काहीही प्रतिक्रिया देणं अजित पवारांनी टाळलं आहे.