बारामतीत काका-पुतण्याची लढत? विधानसभेसाठी अजित पवारांविरोधात शरद पवार मोठा निर्णय घेणार?

बारामतीत विधानसभेला अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवारांना उमेदवारी देण्याची मागणी

बारामती लोकसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीतला सर्वात चर्चेत राहिलेला मतदारसंघ होता. कारण महायुतीने सुनेत्रा पवारांना तिकिट दिलं होतं. तर महाविकास आघाडीने सुप्रिया सुळेंना तिकिट दिलं होतं. सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला. त्यानंतर आता बारामतीत काका-पुतण्या भिडण्याची चिन्हं आहेत. याचं कारण बारामतीतल्या शरदचंद्र पवार पक्षाने केलेली मागणी. अजित पवारांना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार टक्कर देणार असल्याची चर्चा आहे.

ही चर्चा नेमकी का होते आहे?

बारामतीतल्या विजयानंतर शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. या कार्यकर्त्यांनी मागणी केली युगेंद्र पवारांना तिकिट द्या. बारामतीचा दादा बदलायचा आहे. यानंतर विधानसभा निवडणुकीला युगेंद्र पवार यांना तिकिट देण्याची मागणी वाढते आहे. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत. आता अजित पवारांना त्यांचा पुतण्याच त्यांना टक्कर देणार असल्याची चर्चा आहे.

हे वाचले का?  Shivaji Maharaj Statue : शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, नव्या पुतळ्यासाठी योजना तयार

युगेंद्र पवारांची राजकारणात एंट्री?

आज शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने युगेंद्र पवारांना उमेदवारी द्या अशी मागणी करण्यात आली. मंगळवारी युगेंद्र पवार बारामतीत दौरा करत जनता दरबार घेतात. युगेंद्र पवार हे राजकारणात एंट्री घेणार का? तसंच शरद पवार त्यांना विधानसभा निवडणुकीत तिकिट देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

कोण आहेत युगेंद्र पवार?

अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा म्हणजे युगेंद्र पवार. युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार आहेत. शरयू ग्रुपच्या माध्यमातून युगेंद्र पवार हे त्यांच्या व्यवसायात सक्रिय आहेत. फलटण तालुक्यातील शरयू साखर कारखान्याचं कामकाज युगेंद्र पवार पाहतात. लोकसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळेंचा प्रचार केला होता. आता याच युगेंद्र पवार यांना तिकिट देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. शरद पवार याबाबत काही निर्णय घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana : ॲप आणि संकेतस्थळ बंद, लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भराल? जाणून घ्या सोपी प्रक्रिया!

युगेंद्र पवार यांना उमेदवारी मिळणार का?

अजित पवारांनी सुप्रिया सुळेंविरोधात त्यांच्या पत्नीला म्हणजेच सुनेत्रा पवारांना निवडणुकीत उभं केलं. हा निर्णय न पटल्याने श्रीनिवास पवारांच्या कुटुंबांने सुप्रिया सुळेंचा प्रचार केला होता. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पवार कुटुंबातीलच व्यक्ती एकमेकांवर टीका करू लागले आणि त्यांना निवडून देखील आणलं. परंतु आता ही लढाई वेगळ्या मार्गावरती आहे. श्रीनिवास पवारांनी काही दिवसापूर्वी जाहीर केलं होतं, जो शरद पवार जो उमेदवार देतील त्याचा मी प्रचार करेन. आता कार्यकर्त्यांच्या मागणीवरून शरद पवार हे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली जाणार का? हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.

हे वाचले का?  धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण? ‘धनगड’ प्रमाणपत्रे रद्द; शिंदे समितीचा अहवाल सादर