बेरोजगारांसाठी मोठी बातमी! मोदी सरकार करणार १० लाख रिक्त जागांसाठी महाभरती

या मेळाव्यादरम्यान नव्याने भरती झालेल्या ७५ हजार लोकांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबरमध्ये रोजगार मेळाव्याचे उद्धघाटन करणार आहेत. या मेळाव्यात १० लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. २२ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यादरम्यान नव्याने भरती झालेल्या ७५ हजार लोकांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. या उमेदवारांना यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत.

“युवकांना रोजगार पुरवण्यासाठी पंतप्रधानांनी दिलेलं वचन पूर्ण करण्यासंदर्भात हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे देशातील नागरिकांच्या विकासामध्ये हातभार लागणार आहे”, असे निवेदन या मेळाव्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केले आहे. या मेळाव्याअंतर्गत पंतप्रधानांच्या निर्देशांनुसार सर्व मंत्र्यांच्या खात्यातील मंजूर रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या मेळाव्यातून निवडले गेलेले कर्मचारी सरकारच्या ३८ खात्यांमधील कार्यालयात नियुक्त केले जातील. या नियुक्तीसाठी ‘ग्रुप A’ (राजपत्रित), ‘ग्रुप B’ (अराजपत्रित) आणि ‘ग्रुप C’ असे वर्गीकरण करण्यात आले आहे.

हे वाचले का?  Adventure Tourism Meet (ATM) 2024: भारतात साहसी पर्यटनाला प्रोत्साहन आणि संधी!

केंद्रीय सशस्त्र दलाचे जवान, सब इंस्पेक्टर, कॉन्स्टेबल, एलडीसी, स्टेनो, पीए, आयकर निरीक्षक या पदांची भरती या मेळाव्यातून करण्यात येणार आहे. या नियुक्त्या मंत्रालयांकडून किंवा यूपीएससी, एसएससी आणि रेल्वे बोर्डाकडून करण्यात येतील. दरम्यान, ‘ग्रुप A’ मध्ये (राजपत्रित) २३ हजार ५८४, ‘ग्रुप B’ मध्ये (राजपत्रित) २६ हजार २८२, ‘ग्रुप B’ (अराजपत्रित) मध्ये ९२ हजार ५२५ तर ‘ग्रुप C’ मध्ये तब्बल आठ लाख ३६ हजार रिक्त जागा आहेत. यातील एकट्या संरक्षण मंत्रालयात ३९ हजार ३६६ जागा रिक्त आहेत. रेल्वे मंत्रालयात दोन लाख ९१ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.