भयावह रुग्णवाढ! देशात २४ तासांत आढळले १,६८,९१२ पॉझिटिव्ह रुग्ण

कोणत्या राज्यातील स्थिती बिघडतेय?

प्रचंड वेगानं होत असलेल्या करोना संक्रमणामुळे दिवसेंदिवस रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशातील रुग्णवाढ नव्या शिखरावर पोहोचली आहे. देशात करोनाचा शिरकाव झाल्यापासूनची ही उच्चांकी रुग्णवाढ असून, कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही २४ तासांत वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेली ही आकडेवारी सरकार आणि आरोग्य व्यवस्थेची झोप उडवणारी आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांत झालेली रुग्णवाढ आणि मृत्यूची संख्या जाहीर केली आहे. रविवारी नोंदवण्यात आली रुग्णसंख्या ही आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ ठरली आहे. २४ तासांत १ लाख ६८ हजार ९१२ करोना बाधित आढळून आले असून, याच कालावधीत देशात ९०४ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ७५ हजार ८६ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशातील एकूण मृतांची संख्याही १ लाख ७० १७९ इतकी झाली असून, एकूण रुग्णसंख्या १,३५,२७,७१७ वर पोहोचली आहे.

हे वाचले का?  IND vs NZ : विराटने शून्यावर बाद होऊनही मोडला धोनीचा मोठा विक्रम, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू

सप्टेंबर-ऑक्टोबरनंतर करोनाची पहिली लाट ओसरली होती. फेब्रुवारीपर्यंत देशात दिवसाला १० हजारांच्या सरासरीने रुग्ण आढळून येत होते. मात्र, करोनाचा अचानक उद्रेक झाल्यानंतर एका महिन्यातच देशात दिवसाला आढळून येणाऱ्या रुग्णसंख्या लाखांच्या घरात पोहोचली होती. एप्रिलमध्ये देशात दररोज एका लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. मागील तीन दिवसांपासून देशात सलग दीड लाखांपेक्षा अधिक रुग्णवाढ नोंदवली गेली आहे.

हे वाचले का?  Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, विशेष न्यायालयाचे आदेश; कारण काय?

कोणत्या राज्यातील स्थिती बिघडतेय?

देशात सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाचा उद्रेक झालेला आहे. महाराष्ट्रात दिवसाला ५० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रापाठोपाठ इतर राज्यातील परिस्थितीही बिघडत चालली आहे. दिल्ली, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक आदी राज्यात मोठ्या वेगाने रुग्णवाढ होत आहे. महत्त्वाचं म्हणजे दिल्लीतील परिस्थितीही वाईट असून, लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता आहे.