भाजपा उमेदवारांची यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी? श्रीगोंद्यात सुवर्णा पाचपुतेंचा निर्धार, “पक्षाला ताकद दाखवणार”

Shrigonda Assembly Constituency : भाजपाने श्रीगोंद्यातून प्रतिभा पाचपुतेंना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे.

Shrigonda Assembly Constituency Suvarna Pachpute : भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळू लागलं आहे. अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यामधील श्रीगोंदा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून भाजपा नेत्या तथा भाजपा महिला आघाडीच्या आहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस सुवर्णा पाचपुते इच्छुक होत्या. त्यांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी देखील केली होती. मात्र, पक्षाने त्यांच्याऐवजी प्रतिभा पुचपुते यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सुवर्णा पाचपुते यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. प्रसारमाध्यमांसमोर बोलताना त्यांना हुंदका आवरता आला नाही. तसेच त्यांनी भाजपावर टीका केली आहे. यासह सुवर्णा पाचपुते यांनी पक्षाला ताकद दाखवून देईन असा इशारा देखील दिला आहे.

हे वाचले का?  थोरात-विखे तिसऱ्या पिढीतील संघर्षाची झाली नांदी..; डॉ सुजय विखे व डॉ. जयश्री थोरात आमने सामने

सुवर्ण पाचपुते म्हणाल्या, “मला लोकांचा मोठा आधार मिळाला आहे. आज माझ्या डोळ्यात पाणी आलंय, पण ते खाली गळत नाही. कारण माझ्यामागे मोठा जनसमुदाय उभा आहे. लोकांचा मला पाठिंबा आहे. माझे लोक मला सांगतायत, ताई तुम्ही काहीही करा, परंतु, निवडणुकीला उभ्या राहा. त्यामुळे मी एक गोष्ट करणार आहे. माझी आणि पक्षाची विचारधारा सारखी आहे. त्यामुळे मी निवडणूक लढले तर अपक्ष लढेन. मी इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. मला केवळ माझ्या पक्षाला स्वतःची ताकद दाखवून द्यायची आहे. कारण माझा पक्ष धृतराष्ट्रासारखा झाला आहे. त्यांना असं वाटतंय की महाभारत व्हायचं ते होऊ द्या, जनतेचं जे काही व्हायचं असेल ते होऊ द्या. आम्हाला केवळ आमची सत्ता आणायची आहे. जवळपास प्रत्येक पक्षाचं होच ध्येयधोरण आहे.