भाजपा नेते आशिष शेलार यांनाही काल दहा वेळा धमकीचे कॉल आले.
राज्यातील भाजपाचे महत्वाचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. जामनेर येथे मंगळवारी एका कार्यक्रमादरम्यान महाजन यांच्या स्वीय सहाय्यकाला धमकीचा फोन आला होता. भाजपा नेते आशिष शेलार यांनाही काल रात्री दहा वेळा धमकीचे कॉल आले होते.
गिरीश महाजन यांच्या जी. एम. फाउंडेशनतर्फे ग्लोबल हॉस्पिटलचे मंगळवारी जामनेर येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात महाजन याचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांना एक फोन आला. यामध्ये गिरीश महाजन यांना एक कोटी रुपये देण्यास सांग अन्यथा बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली. काही वेळानंतर त्यांच्या मोबाईलवर धमकी देणाऱ्या व्यक्तीने मेसेजही केला आणि त्यात संध्याकाळी पाच वाजता स्फोट घडवून आणण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून जामनेर पोलिसांमध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सरकारनामाने याबाबत वृत्त दिलं आहे.
दरम्यान, कालच भाजपाचे मुंबईतील नेते आशिष शेलार यांनाही दहा धमकीचे फोन आले होते. या फोन करणाऱ्यांना पोलिसांनी आज मुंब्र्यातून अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार, शिवसेनेचे खसदार संजय राऊत आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमक्यांचे फोन आले होते. या नेत्यांना धमकी देणाऱ्याला पोलिसांनी कोलकात्यातून अटक केली होती, तो दाऊदचा हस्तक असल्याचे सांगण्यात येत होते.