‘भारत जोडो’त नर्मदा प्रकल्पाचे विरोधक – मोदी

भारत जोडो यात्रेमध्ये नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर सहभागी झाल्या.

भारत जोडो यात्रेमध्ये नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर सहभागी झाल्या. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ‘‘ज्या महिलेमुळे गुजरातमधील नर्मदा धरण प्रकल्प तब्बल तीस वर्षे रखडला अशा महिलेसोबत काँग्रेसचा एक नेता पदयात्रा काढताना दिसला,’’ अशी टीका मोदींनी गुजरातमधील धोराजी येथे निवडणूक प्रचाराच्या सभेत केली.मोदी म्हणाले, की काँग्रेसचे नेते जेव्हा तुमच्याकडे मते मागायला येतील, तेव्हा गुजरातमधील नर्मदा धरणास विरोध करणाऱ्यांसह तुम्ही पदयात्रा काढत आहात, याबद्दल त्यांना जाब विचारा. जर नर्मदा धरण प्रकल्प पूर्ण झाला नसता तर गुजरातची स्थिती काय झाली असती? नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लांबणीवर पडला. कारण अनेकांनी तो रोखण्याचा खूप प्रयत्न केला. कच्छ आणि काठियावाड (सौराष्ट्र प्रांत) यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नर्मदा प्रकल्प हा एकमेव उपाय होता. सरदार सरोवर धरण विरोधी असलेल्या महिलेसोबत काँग्रेसचा नेता कसा पदयात्रा काढत होता, हे तुम्ही काल पाहिले असेलच. या धरणविरोधी महिला नेत्यासह इतरांनी कायदेशीर अडथळे निर्माण करून तीन दशके प्रकल्प रखडवला. येथे पाणी पोहोचू नये म्हणून त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यांनी गुजरातची इतकी बदनामी केली, की जागतिक बँकेनेही या प्रकल्पाला निधी देणे थांबवले.

हे वाचले का?  Vinesh Phogat : “…तर भारताने ऑलिम्पिकवर बहिष्कार घालावा”, विरोधकांची मागणी; पंतप्रधान काय म्हणाले?

गुजरातमधील भाजप सरकारने गेल्या २० वर्षांत लहान धरणे बांधणे, नवीन विहिरी आणि तलाव खोदणे आणि जलवाहिनीद्वारे पाणी वाहून नेणे अशा विविध योजनांद्वारे पाणीटंचाई प्रश्न सोडविण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. आज संपूर्ण कच्छ-काठियावाड प्रदेशाला जलवाहिन्यांच्या जाळय़ामुळे पाणीपुरवठा होत आहे. समस्यांवर कायमस्वरूपी उपाय करण्यावर आमचा विश्वास आहे. विकासासाठी पाणी आणि वीज आम्हाला आवश्यक वाटते. काँग्रेस सरकारला फक्त हातपंप उभारण्यात रस होता, अशी टीकाही मोदींनी केली.

हे वाचले का?  Manu Bhaker Won 2nd Bronze: मनूचे ऐतिहासिक दुसरे कांस्यपदक; सरबज्योतसह १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील मिश्र सांघिक गटात यश