भारत-पाकिस्तान सलामी २४ ऑक्टोबरला

‘आयसीसी’ने जाहीर केलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या वेळापत्रकानुसार भारताची दुसरी लढत ३१ ऑक्टोबरला दुबईतच न्यूझीलंडशी होणार आहे

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची सलामीची लढत दुबईमध्ये २४ ऑक्टोबरला परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी जाहीर केले.

‘आयसीसी’ने जाहीर केलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या वेळापत्रकानुसार भारताची दुसरी लढत ३१ ऑक्टोबरला दुबईतच न्यूझीलंडशी होणार आहे, तर ३ नोव्हेंबरला अबू धाबी येथे अफगाणिस्तानशी पुढील सामना होईल. भारताचे ‘अव्वल-१२’ संघांमधील उर्वरित दोन सामन्यांचे प्रतिस्पर्धी मात्र साखळीच्या पहिल्या फेरीनंतर निश्चित होतील. भारत ब-गटातील विजेत्याची ५ नोव्हेंबरला, तर अ-गटातील विजेत्याशी ८ नोव्हेंबरला सामना करणार आहे.

स्पर्धेची पहिली फेरी १७ ऑक्टोबरला ओमान  येथे सुरू होईल. पहिल्याच दिवशी यजमान संघ पापुआ न्यू गिनीशी, तर बांगलादेशचा संघ स्कॉटलंडशी सामना करणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ ‘अव्वल-१२’ या दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरतील.

हे वाचले का?  Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा

‘अव्वल-१२’ फेरीला २३ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार असून, पहिल्याच दिवशी अबू धाबी येथे ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे, तर दुबईत इंग्लंडचा संघ दोन वेळा विश्वविजेत्या वेस्ट इंडिजशी मुकाबला करणार आहे. २०१६मध्ये ईडन गार्डन्स येथे झालेल्या अंतिम सामन्यात विंडीजने इंग्लंडला नमवून जेतेपद पटकावले होते.

करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे भारताच्या यजमानपदाखालील ही स्पर्धा ‘आयपीएल’ संपल्यानंतर संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे खेळवण्यात येणार आहे.

अंतिम सामना १४ नोव्हेंबरला

स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना अबू धाबी येथे १० नोव्हेंबरला होईल, तर दुसरा सामना दुबई येथे ११ नोव्हेंबरला होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला दुबई येथेच खेळवला जाणार आहे. १५ नोव्हेंबर या राखीव दिवसाची तरतूदसुद्धा करण्यात आली आहे.

हे वाचले का?  Ramiz Raja on Team India: “…म्हणून भारतीय क्रिकेट संघाचा धाक निर्माण झाला आहे”, रमीझ राजा यांनी टीम इंडियाचं केलं कौतुक

२००७च्या विश्वचषक स्पर्धेतील आमचा स्कॉटलंडविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे आम्ही पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळलो. पाकिस्तानसारख्या संघाविरुद्ध सुरुवातीच्या टप्प्यातच सामना होणे महत्त्वाचे असते. जेणेकरून स्पर्धेकडे लक्ष केंद्रित करता येते. अन्यथा पाकिस्तानच्याच सामन्याचा खेळाडू विचार करीत राहतात. -गौतम गंभीर, भारताचा माजी क्रिकेटपटू

अमिरातीमध्ये गेल्या १० वर्षांहून अधिक काळ आम्ही खेळतो आहोत. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषक घरच्या मैदानावरच होत असल्याची आमची भावना आहे. त्यामुळे ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सरस ठरण्याची ही आमच्यासाठी नामी संधी असेल. भारताविरुद्धच्या सामन्यासाठी निश्चितच आम्ही सर्व उत्सुक आहोत. -बाबर आझम, पाकिस्तानचा कर्णधार

हे वाचले का?  ऑलिम्पिक आयोजनाचे स्वप्न! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

पहिल्या फेरीची गटवारी

अ-गट : श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, नामिबिया

ब-गट : बांगलादेश, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, ओमान