भारत राष्ट्र समिती पक्षाला महाराष्ट्रात आणण्याची सत्ताधार्‍यांची खेळी, शरद पवार यांचा आरोप

भारत राष्ट्र समिती पक्ष हा सत्ताधार्‍यांची बी टीम असण्याची शक्यता आहे. यावेळी भारत राष्ट्र समिती पक्षाचा फटकाही बसू शकतो, अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी वर्तविली.

जळगाव : गेल्या निवडणुकीत आम्हाला वंचित आघाडीचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे याही वेळी भारत राष्ट्र समिती पक्षाला महाराष्ट्रात आणण्याची खेळी राज्यातील सत्ताधार्‍यांची असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत राष्ट्र समिती पक्ष हा सत्ताधार्‍यांची बी टीम असण्याची शक्यता आहे. यावेळी भारत राष्ट्र समिती पक्षाचा फटकाही बसू शकतो, अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी वर्तविली.

अमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागातर्फे शुक्रवारी राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिर घेण्यात आले. त्यानिमित्ताने  पवार हे अमळनेरमध्ये आले असता, त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेतकर्‍यांच्या प्रश्‍नी सरकारला गांभीर्य नसल्याचा आरोप केला. यावेळी आमदार एकनाथ खडसे, अनिल पाटील उपस्थित होते. पवार यांनी सद्यःस्थितीतील राजकीय घडामोडींवरही भाष्य केले. पवार यांनी जाहिरातीवरून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

हे वाचले का?  Rohit Pawar on Narendra Modi: “भटकत्या आत्म्याची भीती अजूनही…”, रोहित पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले, “महाराष्ट्रात येणं…”!

महाराष्ट्राचे भाग्य आहे की अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एका व्यक्तीबद्दलच्या नावलौकिकाची जाहिरात त्यांच्या कुठल्या हितचिंतकांनी दिली, हे आम्हाला माहिती नाही. आमचा समज होता की, हे सरकार भाजपमुळे बनले आहे. यात या सरकारमध्ये भाजप आमदारांची मोठी संख्या आहे. मुख्यमंत्र्यांच्या या जाहिरातीमुळे आमच्यासह लोकांच्या ज्ञानात भर पडली आहे की, सरकारमध्ये भाजपचे योगदान जास्त नाही, ते अन्य घटकांचे आहे. महाराष्ट्राला कळविण्याचे ऐतिहासिक काम या जाहिरातीच्या माध्यमातून झाले आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद, असा चिमटाही पवार यांनी काढला.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे भारत राष्ट्र समिती पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात पाय रोवण्याचे प्रयत्न करीत आहेत. यावर पवार यांनी सांगितले की, लोकशाहीमध्ये कुणाला कुठेही जाऊन काम करण्याचा अधिकार आहे. मात्र, महाराष्ट्रात असे दिसते आहे की, स्वतः लढायचे असते आणि दुसर्‍या एक-दोन टीम तयार करायच्या असतात. पायात पाय घालण्यासाठी याला राजकारणाची बी टीम म्हणतात. बी टीम आहे की काय, ते लवकरच कळेल, असे पवार म्हणाले.

हे वाचले का?  Mahayuti : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ, महायुतीपुढची नेमकी आव्हानं काय?

देशभरातील भाजपच्या निवडणुकीतील यशावर पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, केरळमध्ये भाजप नाही. शेजारी तमिळनाडूतही भाजप नाही. कर्नाटकमध्ये आता निवडणुका झाल्या. तेथेही भाजप सत्तेत नाही. झारखंड, उत्तराखंड, तेलंगणा, ओडिशा, दिल्ली, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश, पश्‍चिम बंगालमध्येही भाजप नाही. भाजप आहे तरी कुठे? मध्य प्रदेशात भाजप सत्तेत आहे. मात्र, तिथे त्यांचे राज्य नव्हते. तिथे कमलनाथ यांच्या नेतृत्वात सरकार होते. मध्य प्रदेश, गोव्यात आमदार फोडून भाजपने सरकार स्थापन केले. महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी खोक्यांचा वापर करण्यात आला, असे पवार यांनी सांगितले.

राज्यात कायदा-सुव्यवस्था धोक्यात आल्याचा आरोप करीत पवार म्हणाले, की राज्यात काही दिवसांपूर्वी दहा ते पंधरा भागांत दंगली घडल्या. राज्य सरकारने यात हस्तक्षेप करीत त्याबाबतची जबाबदारी घेऊन सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. पवार यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवरही भाष्य केले. कापसाला भाव नसल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. कापसाच्या भावावरून राष्ट्रवादी पक्ष आक्रमक झाला असून, शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करावे, असे म्हणणारे सरकार अपयशी ठरले आहे. शेतीसाठी लागणारा पैसा कापसातून येणार होता. मात्र, सध्या याबाबतीत शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत. राज्यात अद्याप 50 टक्के कापूस शेतकर्‍यांच्या घरात आहे. यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. सोयाबीनलाही भाव नाही. शेतीमालाला हमीभावही मिळत नाही. शेतकर्‍यांना कापसाचे अनुदान देऊन आर्थिक मदत केली पाहिजे, अशी मागणीही पवार यांनी केली.

हे वाचले का?  Maharashtra Breaking News Live : मराठा ठोक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त