“भारत हिंदू राष्ट्र नाही”, नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचं निवडणूक विश्लेषण!

नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी भारताच्या वर्तमान राजकीय परिस्थितीबाबत बोलताना चिंता व्यक्त केली.

भारतातील जगविख्यात अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पुरस्कार मिळविणारे अमर्त्य सेन हे आपल्या परखड मतांसाठी ओळखले जातात. अमर्त्य सेन यांनी भारतातील वास्तवाबाबत अनेकदा मतप्रदर्शन केलेलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवरून त्यांनी सत्ताधारी भाजपाला टोला लगावला. लोकसभेच्या निकालांमुळे भारत हे हिंदू राष्ट्र नाही, हे स्पष्ट झाले आहे, असे मोठं विधान त्यांनी केलं. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात एक सर्वसमावेशक संविधान असताना आपल्या पुढाऱ्यांनी राजकीय उदारमतवाद दाखवायला हवा, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

माध्यमांशी बोलताना अमर्त्य सेन यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले, याबाबत पीटीआय वृत्तसंस्थेने बातमी दिली आहे. “भारताला हिंदू राष्ट्र बनविण्याची कल्पना मला योग्य वाटत नाही. भारत हे हिंदू राष्ट्र नाही, हे लोकसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे”, असे विधान त्यांनी केलं.

हे वाचले का?  Narendra Modi : मोदींचं पोलंडमध्ये मराठीतून भाषण! कोल्हापूर स्मारकाला भेट देऊन म्हणाले, “छत्रपती घराण्याने पोलिश महिला व मुलांसाठी…”

९० वर्षीय अमर्त्य सेन यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना न्यायालयीन सुनावणीशिवाय तुरुंगात टाकण्याच्या पद्धतीबद्दलही नापसंती व्यक्त केली. “प्रत्येक निवडणुकीनंतर काहीतरी बदल होईल, अशी अपेक्षा आपण ठेवतो. गेल्या काही निवडणुकांनंतर देशात काय झाले, हे आपण पाहिले. काही नेत्यांना कायदेशीर प्रक्रियेशिवाय तुरुंगात टाकले जात आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढत चालली आहे. हे सर्व थांबायला हवे”, अशी अपेक्षाही अमर्त्य सेन यांनी व्यक्त केली.

याबाबतचा दाखला देताना ते म्हणाले की, माझ्या लहानपणी ब्रिटिश राजवटीत मी या गोष्टी पाहिल्या होत्या. न्यायालयीन सुनावणीला टाळून नेत्यांना तुरुंगात डांबले जात होते. “मी लहान असताना पाहिले की, माझे अनेक नातेवाईक कायदेशीर प्रक्रियेशिवाय तुरंगात टाकले गेले होते. मला वाटतं भारत यापासून कधीतरी मुक्त होईल. काँग्रेसच्या सरकारच्या काळातही हे बदलले नाही, तो त्यांचा दोष होता. पण सध्याच्या सरकारच्या काळात ही पद्धत अधिक प्रचलित झाली आहे”, अशा शब्दांत सेन यांनी काँग्रेस आणि भाजपावर टीका केली.

हे वाचले का?  अंतराळातील कचऱ्याबद्दल राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त

देशाची खरी ओळख झाकण्याचा प्रयत्न झाला

नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी भाजपाच्या अयोध्येतील (फैजाबाद) पराभवाबाबतही भाष्य केलं. ते म्हणाले, “राम मंदिर निर्माणावर बराच पैसा खर्च करण्यात आला. यातून भारत हे हिंदू राष्ट्र आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न झाला. महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या काळातही असा प्रयत्न कधी झाला नाही. भारताची खरी ओळख झाकण्याचा हा प्रयत्न होता, त्यात बदल झाला पाहीजे.”

हे वाचले का?  Vinesh Phogat : “ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर भारत सरकारने सहकार्य केलं नाही”, विनेश फोगटचा गंभीर आरोप