भारताने नव्याने ४३ अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीनकडून गंभीर आरोप

अ‍ॅपबंदीच्या निर्णयाने चीनचा संताप

भारताकडून अजून ४३ अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीन संतापला आहे. भारताकडून घेण्यात आलेल्या अ‍ॅप्सबंदीच्या निर्णयाचा चीनने विरोध केला आहे. भारत वारंवार राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली अ‍ॅप्सवर बंदी घालत असल्याचा गंभीर आरोप चीनकडून करण्यात आला आहे. मंगळवारी इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ४३ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली असून त्यात अलीबाबा वर्कबेंच, अलीएक्स्प्रेस, अलीपे कॅशियर, कॅमकार्ड, वुई डेट यांचा समावेश आहे. भारताचे सार्वभौमत्व, सुरक्षा व सार्वजनिक व्यवस्था यांना या उपयोजनांमुळे धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे.

हे वाचले का?  इस्रायलवरील हल्ल्याची वर्षपूर्ती; पूर्वसंध्येला लेबनॉन लक्ष्य, तर हेझबोलाकडूनही प्रतिहल्ला!

चिनी प्रवक्ते जी रोंग यांनी भारताच्या निर्णयाचा विरोध करताना म्हटलं आहे की, “अ‍ॅप्सवर बंदी घालण्यासाठी वारंवार राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण केला जात असून चीन याचा विरोध करत आहे. आशा आहे की भारत बाजारपेठेत सर्वांना निष्पक्ष, निःपक्षपातीपणे व्यवसाय करु देईल आणि भेदभाव करणार नाही”.

जी रोंग यांनी यावेळी भारताने केलेली अ‍ॅप्सबंदी हा जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं उल्लंघन करणारी असल्याचा आरोप केला आहे. “चीन आणि भारत धोक्यांऐवजी एकमेकांसाठी विकासाच्या संधी आहेत. दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापारिक संबंध योग्य मार्गावर आणले पाहिजेत,” असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

हे वाचले का?  कॅनडाने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला; भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांचा आरोप; वागणुकीवरही टीकास्रा