भारताला जागतिक भूमिका हवी! अमेरिका दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

व्यापक, सखोल आणि उच्च दर्जा ही भारताची ओळख असून, जागतिक स्तरावर मोठी भूमिका निभावण्याची आपल्या देशाची क्षमता आहे

पीटीआय, नवी दिल्ली

व्यापक, सखोल आणि उच्च दर्जा ही भारताची ओळख असून, जागतिक स्तरावर मोठी भूमिका निभावण्याची आपल्या देशाची क्षमता आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केला. अमेरिकेच्या ऐतिहासिक दौऱ्यावर निघण्यापूर्वी अमेरिकेतील ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अमेरिका आणि भारताच्या संबंधांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले.

सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर राखणे, कायदेशीर नियम पाळणे आणि मतभेद आणि विवादांच्या शांततापूर्ण निराकरणावर आमचा दृढ विश्वास आहे. भारत आपले सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी सदैव सज्ज आणि वचनबद्ध आहे. मात्र, भारत विस्तारवादी नसल्याने कोणत्याही देशावर आक्रमण करत नाही. जगात आपल्याला योग्य स्थान मिळावे यासाठी भारत आग्रही आहे, असे मुद्दे मोदी यांनी मांडले. सध्याच्या भू-राजकीय तणावाच्या काळात बहुराष्ट्रीय कंपन्या उत्पादन आणि जागतिक पुरवठा साखळय़ांत विविधता आणू पाहत आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी भारत सज्ज असल्याचे मतही मोदींनी व्यक्त केले.

हे वाचले का?  भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?

मोदी म्हणाले की, अमेरिका आणि भारतादरम्यानचे संबंध कधी नव्हे एवढे दृढ झाले आहेत. उभय देशांच्या नेत्यांत अभूतपूर्व विश्वासाचे वातावरण आहे. युक्रेन संघर्षांबाबत आपण तटस्थ नसून, शांततेच्या बाजूने आहोत. सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचा आणि देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

अनेक प्रतिष्ठित मान्यवरांच्या भेटीगाठी

न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या अमेरिकेतील दौऱ्यात अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञ, विद्वान, विचारवंतांना भेटणार आहेत. यात ‘टेस्ला’ आणि ‘ट्विटर’चे मालक इलॉन मस्क यांची भेट महत्त्वाची आहे. उद्योजक, नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ पॉल रोमर, खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक नील डिग्रास, लेखक निकोलस नासीम तालिब, गुंतवणूकदार रे डालियो, फालू शाह, जेफ स्मिथ, मायकेल फ्रॉमन, डॅनियल रसेल, एल्ब्रिज कोल्बी, पीटर आग्रे, स्टीफन क्लास्को आणि चंद्रिका टंडन आदींच्या भेटीगाठी ते घेतील.

हे वाचले का?  PM Modi calls Biden: पंतप्रधान मोदींचा बायडेन यांना फोन; युक्रेन दौरा आणि बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षिततेवर चर्चा

सीमेवर शांतता आवश्यक

‘चीनबरोबर असलेल्या सीमा भागात शांतता आणि स्थैर्य राखणे आवश्यक आहे. तरच चीनशी सामान्य द्विपक्षीय संबंध राहू शकतील,’ असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. भारत आपले सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी कटिबद्ध व सदैव सज्ज आहे. सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करणे, कायद्याचे पालन करणे आणि मतभेद आणि विवादांचे शांततापूर्ण मार्गाने निराकरण करणे यावर भारताचा दृढ विश्वास आहे, असेही त्यांनी सांगितले.

हे वाचले का?  छुप्या दहशतवादाचे हत्यार! जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांना अतिदक्षता बाळगण्याचे आदेश

महत्त्वाच्या जागतिक संस्थांमध्ये खरोखरच लोकशाही मूल्यांनुसार प्रत्येक राष्ट्राला प्रतिनिधित्व आहे का? लोकसंख्या, अर्थव्यवस्था हे घटक पाहता, या संघटनेत भारताला योग्य प्रतिनिधित्व मिळत आहे का, याचा विचार जगाने करावा. –नरेंद्र मोदी, पंतप्रधान