भाव कमी मिळाला तरी कांदा पीक परवडणारे

शेतकऱ्यांचा भरवसा कायम

अनिकेत साठे

गहू, हरभरा, मका असे कोणतेही पीक घेतले तरी हाती येणारे उत्पादन आणि त्यास मिळणारा भाव परवडत नाही. कांदा दराबाबत सदैव अनिश्चितता असते. पण, तुलनेत उत्पादन जास्त होते. त्याला पर्याय ठरू शकेल, असे दुसरे पीक नाही… मानोरीचा तरुण शेतकरी अमोल शेळके सांगत होता. वडिलोपार्जिंत चार एकर शेतीत वर्षानुवर्ष हे कुटुंब कांदा लागवड करते. स्थानिक पातळीवर असे हजारो शेतकरी आहेत. कांदा दरात कमालीचे चढ -उतार असूनही ते याच नगदी पिकाला पसंती देतात. किंबहुना लागवडीचे क्षेत्र विस्तारतात. हंगामात एकदा भाव गवसला तरी आर्थिक समीकरण जुळते. या विश्वासामुळे दोलायमान अवस्थेतही कांदा उत्पादनावर परिणाम झाला नसल्याचे दिसून येते.

उत्पादन, निर्यात, देशांतर्गत मागणी अशा अनेक बाबींवर कांद्याचे दर अवलंबून असतात. मजुरीचा खर्च वाढत आहे. नैसर्गिक संकटामुळे जास्तीची औषध-खते द्यावी लागतात. काही वर्षापूर्वी कांदा शेती परवडत होती. आता मात्र तसे ठामपणे सांगता येत नसल्याचे शेतकरी सांगतात. असे असूनही शेतकरी अन्य पिकाकडे वळत नाही. त्याची कारणमिमांसा कृषी तज्ज्ञ सचिन होळकर यांनी केली. एक एकरात गव्हाची लागवड केल्यास २० पोते (क्विंटल) उत्पादन होते. त्यास सध्या १६०० रुपयांच्या आसपास भाव आहे. म्हणजे ३२ ते ३४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. उत्पादन खर्च वजा जाता १२ ते १४ हजार रुपये नफा मिळतो. तेवढ्याच क्षेत्रात कांद्याचे उत्पादन घेतल्यास खरीप हंगामात (लाल) ५० ते ६० क्विंटल आणि रब्बीत (उन्हाळ) १०० ते १२५ क्विंटलपर्यंत उत्पादन होते. खर्च जास्त म्हणजे एकरी ७० हजार रुपये असला तरी क्विंटलला १२०० ते १५०० रुपये भाव मिळाला तरी परवडू शकतो. मक्याचे अर्थकारणही जुळत नाही. हरभऱ्याचे उत्पादन कमी होते. जिल्ह्यात एक वगळता सर्व साखर कारखाने बंद पडले. गेल्या वर्षी हजारो टन ऊस पडून राहिला. कोणत्याही पिकाची शाश्वती नाही. कांद्याला भाव मिळेल, तो साठविता येईल या अपेक्षेने त्याची लागवड होते, असे होळकर यांनी नमूद केले. उन्हाळ कांदा काढणीवेळी ओला असतो. त्याचे वजन जास्त भरते. तेव्हा हजार ते १२०० रुपये भाव मिळाला तरी परवडते असे  शेळके

हे वाचले का?  दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा

यांच्यासह अन्य शेतकरी मान्य करतात.आवक घटली की, दर वधारतात हा बाजारपेठेचा नियम. मात्र, कांदा बाजारात कमी आवक होऊनदेखील भाव तळ गाठतात आणि प्रचंड आवक होऊनही कधीकधी ते उंचावल्याची उदाहरणे आहेत. कांद्याच्या सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीतील गेल्या पाच वर्षातील आकडेवारीतून हा विरोधाभास अधोरेखित होतो. वर्षभरात खरीप (लाल), उशिराचा खरीप (रांगडा) आणि रब्बीतील उन्हाळ अशा तीन प्रकारच्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. खरीप, उशिराचा खरीप या लाल कांद्याचे उत्पादन कमी असते. त्याला भाव चांगला मिळतो. २०२०-२१ वर्षात लासलगाव बाजार समितीत आतापर्यंत एकूण ४० लाख ३० हजार ६० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होऊन त्यास प्रति क्विंटलला सरासरी १९६९ रुपये दर मिळाला. तर याच वर्षात लाल कांद्याची आतापर्यंत १४ लाख २६ हजार १३५ क्विंटल आवक झाली. त्याला सरासरी २९३२ रुपये भाव मिळाला. बुधवारी या दोन्ही कांद्याचे सरासरी दर ९०० ते ९५० रुपयांपर्यंत खाली आले.

हे वाचले का?  यादीतील एक हजारपेक्षा अधिक जणांना प्रतीक्षा, सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

पाच वर्षांत कमालीचे चढ-उतार

२०१६-१७ या वर्षात लासलगाव बाजार समितीत ४२ लाख ३८ हजार ७२६ क्विंटल कांदा विक्रीला आला होता. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वात कमी आवक. त्या वर्षी उन्हाळला प्रति क्विंटल सरासरी ६१७ तर लाल कांद्याला ६४८ रुपये दर मिळाला. त्या पुढील वर्षात अर्थात २०१७-२८ मध्ये १० लाखहून अधिक क्विंटलने आवक वाढून ५२ लाख ८० हजार ४४३ वर गेली. तेव्हा उन्हाळला सरासरी १३४१ आणि लाल कांद्याला १९५२ रुपये भाव मिळाला. २०१८-१९ हे वर्षही त्यास अपवाद ठरले नाही. या वर्षात तर सर्वाधिक म्हणजे तब्बल ६४ लाख ३४ हजार ७१८ क्विंटलची आवक झाली. उन्हाळला ७०० आणि लाल कांद्यास ८७० रुपये दर मिळाले. २०१९-२० वर्षात ५९ लाख ९४ हजार २०७ क्विंटलची आवक झाली. उन्हाळला २,८५० तर लाल कांद्याला ३,११० रुपये भाव मिळाला. चालू वर्षात म्हणजे २०२०-२१ मध्ये आतापर्यंत ५४ लाख ५६ हजार १९५ क्विंटल आवक झाली. उन्हाळला सरासरी १९५९ तर लाल कांद्याला २९३२ रुपये भाव मिळाला.

हे वाचले का?  नाशिक शहरात मतदान केंद्र बदलल्याने गोंधळ, जिल्ह्यात दोन तासांत ६.९३ टक्के मतदान