“भुजबळसाहेब, आमच्याकडे पांढऱ्या दाढीचा…”, छगन भुजबळांच्या ‘त्या’ विधानावर देवेंद्र फडणवीसांचा टोला!

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “तुम्ही ज्येष्ठ आहात. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माफी आहे. त्यामुळे तुम्ही…!”

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात जसे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असतात, त्याचप्रमाणे एकमेकांवर टोलेबाजी, कोपरखळ्या आणि त्यानंतर पिकणारा हशा या गोष्टी देखील होत असतात. सध्या सुरु असलेलंय विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन देखील त्याला अपवाद नाही. गुरुवारी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी केलेल्या एका मिश्किल टिप्पणीची बरीच चर्चा काल दिवसभर विधानभवन परिसरात सुरू होती. कारण भुजबळांनी या विधानामध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पांढऱ्या दाढीलाच हात घातल्यामुळे त्यावरून विधानसभेतच आधी अजित पवार आणि नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील लगावलेल्या टोल्यांनी सभागृहात चांगलाच हशा पिकला!

नेमकं घडलं काय?

विधानसभेच्या कामकाजादरम्यान आज जीएसटीसंदर्भातलं विधेयक चर्चेला आल्यानंतर त्यावर बोलण्यासाठी छगन भुजबळ उभे राहिले. यावेळी जीएसटीसंदर्भातील आपला मुद्दा मांडण्यापूर्वी छगन भुजबळांनी केलेल्या टिप्पणीमुळे सभागृहात चांगलाच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. समोर बसलेल्या मुख्यमंत्र्यांना उद्देशून बोलताना छगन भुजबळांनी त्यांच्या दाढीवर मिश्किल टिप्पणी केली. “समोर मुख्यमंत्री बसले आहेत. मला मुख्यमंत्र्यांकडे बघून खूप आनंद झाला आहे. पण तुम्ही मुख्यमंत्री झालात यासोबतच मला आनंद वेगळाच आहे. कारण महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री झाले. पण त्यातही सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे. काळ्या दाढीचा प्रभाव फक्त महाराष्ट्रात आहे. सफेद दाढीचा प्रभाव दिल्लीपासून भारतभर आहे”, असं भुजबळ म्हणताच सभागृहातील इतर सदस्यांनी त्याला हसून दाद दिली!

हे वाचले का?  Prakash Ambedkar : राहुल गांधींवर टीका करताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली, अपशब्द वापरत म्हणाले, “ते आपल्याला..”

दरम्यान, छगन भुजबळांच्या या टिप्पणीवरून अजित पवारांनीदेखील पुढे आपल्या भाषणात सत्ताधाऱ्यांना सुनावलं. भुजबळांच्या विधानाचा संदर्भ देताना अजित पवारांनी सांगितलं, “मघाशी छगन भुजबळांनी सांगितलं की पांढरी दाढी, काळी दाढी. पांढऱ्याची काळी दाढी करतात असं मी ऐकलंय. पण काळ्याची पांढरी करायला लागली तरी करा, पण शेतकऱ्यांना मदत जाहीर करा.”

हे वाचले का?  Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: कालीचरण यांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका: म्हणाले…

“तुम्ही ज्येष्ठ आहात, त्यामुळे…”, फडणवीसांचा टोला!

भुजबळ आणि अजित पवार यांच्या भाषणांनंतर बोलायला उभे राहिलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना दाढीबाबतच्या मुद्द्यावरून चिमटा काढला. भुजबळांनी जीएसटीबाबत केलेल्या भाषणाचा संदर्भ घेत फडणवीस म्हणाले, “खरंतर छगन भुजबळांनी लोकसभेतलं भाषण विधानसभेत केलं. पण हरकत नाही. तुम्ही ज्येष्ठ आहात. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माफी आहे. त्यामुळे तुम्ही ते नक्कीच करू शकता”.

नेमकं त्याच वेळी सत्ताधारी बाकांवरून कुणीतरी “पांढरी दाढी आहे म्हणून”, असा टोमणा मारला. यावर फडणवीसांनी लगेच उत्तर देत “हो.. पांढरी दाढी आहे म्हणून. आणि भुजबळ साहेब, पांढऱ्या दाढीचा आमच्याकडे फार सन्मान आहे”, अशा शब्दांत टोला लगावला!

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा मतदारांवर किती परिणाम होईल? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…