भेटलेली माणसे आणि विविध विषयांचे प्रतिबिंब लेखनात उमटते

यावेळी पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या आत्मचरित्रातील अनेक आठवणींना उजाळा दिला.

शरद पवार यांचे प्रतिपादन

नाशिक : प्रवासात अनेक माणसे भेटतात, त्यांच्याशी बोलताना त्यांच्या अडचणी, प्रश्न यांच्याशी समरस होण्याची संधी मिळते. हजारो माणसे जवळून अनुभवायला मिळतात. भेटणाऱ्या या माणसांशी गप्पा मारताना अनेक विषय समजतात, त्याचे प्रतिबिंब लेखनात उमटते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

शंकराचार्य न्यासचा सांस्कृतिक विभाग आणि ज्योती स्टोअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लेखक तुमच्या भेटीला’  उपक्रमास बुधवारपासून सुरुवात झाली. उपक्रमाचे पहिले पुष्प पवार यांनी ऑनलाइन गुंफले. यावेळी पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या आत्मचरित्रातील अनेक आठवणींना उजाळा दिला. आमदार आणि लेखक हेमंत टकले यांनी पवार यांच्याशी संवाद साधला. 

हे वाचले का?  पहिल्या यादीत साडेचार हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची निवड; सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

राज्यातील अशी अनेक शहरांशी माझे जवळचे लागेबांधे असून नाशिक हे त्यापैकीच एक आहे. नाशिकशी माझा जवळचा संबंध आहे. राज्यात पुस्तक विक्रीची अनेक दुकाने आहेत. मात्र त्यापैकी काहीच दुकाने पुस्तक विक्रीसोबत लेखक आणि त्यांच्या साहित्याचा परिचय, साहित्यिकांशी संवाद असे कार्यक्रम आयोजित करत

असतात. ज्योती स्टोअर्स हे त्यापैकीच एक आहे. मी कधीकाळी लेखन केले होते. काँग्रेसच्या ‘शिदोरी’च्या   संपादनाची जबाबदारीही माझ्यावर होती. मात्र काही प्रयोग फसले. माणसे मला हवी तशी पुस्तके देतात. देशात, परदेशात दौऱ्यावर गेलो असताना त्या त्या ठिकाणांहून वेगवेगळय़ा विषयांवरील पुस्तके खरेदी केली असून त्याचा मोठा  संग्रह आपल्याकडे असल्याचे पवार यांनी सांगितले. क्रिकेट, खो खो आदी वेगवेगळय़ा खेळांच्या संघटनांचे अध्यक्षपद भुषविले असून या सर्व खेळांची आवड असल्याने सर्वाशी जोडला गेलो आहे. क्रीडा विश्वात काम करताना, खेळाडूंच्या हक्कांसाठी भांडतांना कुठे विरोध झाला तर कुठे पाठिंबा मिळाला, असेही पवार म्हणाले. ज्योती स्टोअर्सच्या ज्योती खैरनार यांनी प्रास्ताविक केले.

हे वाचले का?  अहमदनगरची अक्षता जाधव अबॅकस परीक्षेमध्ये राज्यात दुसरी