कर्णिक यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून २०१४ ते २०१९ या कालावधीत जबाबदारी सांभाळली.
ज्येष्ठ साहित्यिक आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांना प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे. सोमवारी येथे प्रतिष्ठानच्या वतीने ही घोषणा करण्यात आली. महाकवी कालिदास कलामंदिरात १० मार्चला प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
मराठी साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या जीवनावर ठसा उमटविणाऱ्या साहित्यिकाला येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे जनस्थान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. दर दोन वर्षांनी दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे आहे. कथाकार, कादंबरीकार, कवी, संवाद लेखक अशी साहित्य क्षेत्रात चौफे र ओळख असलेले कर्णिक यांनी महाराष्ट्र राज्य साक्षरता आणि संस्कृती विभाग तसेच राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. कर्णिक यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून २०१४ ते २०१९ या कालावधीत जबाबदारी सांभाळली. प्रतिष्ठानच्या माजी अध्यक्षांची जनस्थान पुरस्कारासाठी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.