मनपा बिटको रुग्णालयात सुविधांचा अभाव; जुन्या रुग्णालयाचे स्थलांतर थांबविण्याची बहुजन रयत परिषदेची मागणी 

महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांची सुविधांअभआवी हेळसांड होत असल्याची तक्रार बहुजन रयत परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

नाशिक : महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांची सुविधांअभआवी हेळसांड होत असल्याची तक्रार बहुजन रयत परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. जुन्या बिटको रुग्णालयाचे स्थलांतर थांबविण्याची मागणीही परिषदेच्या वतीने महापालिका उपआयुक्त मनोज घोडे यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. 

निवेदनात बहुजन रयत परिषदेने भूमिका मांडली आहे. नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात महानगरपालिका हद्दीतील आणि आजूबाजूच्या ३५ ते ४० खेडय़ांतील गरीब रुग्ण औषधोपचारासाठी येत असतात. परंतु, रुग्णालयातील समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. जुन्या बिटको रुग्णालयात क्षय, रक्तदाब, मधुमेह तपासणी, सर्पदंश, गरोदर महिलांची तपासणी करण्याचे काम बी.ए.एम.एस. किंवा एम.बी.बी.एस. डॉक्टरांना करावे लागते. तेच औषधे लिहून देतात.

हे वाचले का?  तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकमध्ये भक्तांची गर्दी

अडलेल्या गरोदर महिला आणि रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. लहान बाळांसाठी प्राणवायूच्या तीनच पेटय़ा असून त्यापैकी एक बंद आहे. दोनच पेटय़ा असल्याने इतर बाळांचे हाल होतात. पेटय़ांची अजुन जास्त प्रमाणात आवश्यकता आहे. कावीळग्रस्त लहान बाळांसाठी लागणाऱ्या फोटो उपचार पध्दतीसाठी प्रकाश कमी आहे.

लहान बाळांसाठी वार्मर यंत्राची कमतरता आहे. सोनोग्राफी यंत्र बंद आहे. शस्त्रक्रिया कक्षाची दुरावस्था झाली आहे. डोळय़ांच्या शस्त्रक्रिया जुन्या बिटको रुग्णालयात होत नाहीत. त्यांना डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात पाठविले जाते. कान, नाक, घसा तज्ज्ञांची उणीव आहे. रक्तपेढीत रक्त पिशव्या नाहीत. सरकारी महालॅबचे अहवाल वेळेवर मिळत नाहीत. रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षात हाडांसंदर्भातील तसेच दंतोपचारसंबंधित साहित्य नसल्याने शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला जातो. जुन्या बिटको रुग्णालयाचे स्थलांतर ताबडतोब थांबविण्यात यावे आणि नवीन बिटको रुग्णालयात संपूर्ण यंत्रणा, तज्ज्ञ डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, सर्व अद्यावत सुविधा पुरविण्यात याव्यात, हे सर्व केल्यानंतर जुन्या बिटको रुग्णालयाचे स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. महापालिका उपायुक्तांना निवेदन देताना बहुजन रयत परिषदेचे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब खंडाळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य साहेबराव शृंगार, उपाध्यक्ष सूर्यकांत भालेराव, संपर्कप्रमुख रवींद्र पाटील, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षा शितल भालेराव आदी उपस्थित होते. महापालिका उपायुक्तांना निवेदन देताना बहुजन रयत परिषदेचे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब खंडाळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य साहेबराव शृंगार, उपाध्यक्ष सूर्यकांत भालेराव, संपर्कप्रमुख रवींद्र पाटील, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षा शितल भालेराव आदी उपस्थित होते.

हे वाचले का?  महाराष्ट्रात यश मिळाल्यास देश जिंकल्याचा संदेश- अमित शहा

गरोदर महिलांची व्यथा

बिटको रुग्णालयात सोमवारी आणि गुरुवारी गरोदर महिलांसाठी बाह्यरुग्ण सेवा वरच्या मजल्यावर दिली जाते. त्यामुळे गरोदर महिलांना त्रास होतो. त्यामुळे बाळाच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. नवीन बिटको रुग्णालयात शस्त्रक्रिया कक्ष तसेच अन्य सुविधा नाहीत. तरीही जुने बिटको रुग्णालय हे नवीन रुग्णालयात स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरु आहेत.