मनोज जरांगे यांच्या शांतता फेरीवर काळ्या झेंड्यांचे सावट

ओबीसीतून आरक्षण मागण्याचा मनोज जरांगे पाटील यांनी हट्ट सोडल्यास त्यांचे आम्ही स्वागत करू. मात्र ते आपल्या हट्टावर कायम राहिल्यास त्यांना १३ ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये काळे झेंडे दाखवले जातील, असा इशारा ओबीसी सुवर्णकार समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी दिला आहे.

नाशिक – ओबीसीतून आरक्षण मागण्याचा मनोज जरांगे पाटील यांनी हट्ट सोडल्यास त्यांचे आम्ही स्वागत करू. मात्र ते आपल्या हट्टावर कायम राहिल्यास त्यांना १३ ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये काळे झेंडे दाखवले जातील, असा इशारा ओबीसी सुवर्णकार समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी दिला आहे. शांतता फेरीच्या दिवशी ओबीसी बांधव काळी गुढी देखील उभारतील, असेही सूचित करण्यात आले आहे.

मराठा आरक्षण प्रश्नाबाबत लढा देणारे जरांगे यांच्या शांतता फेरीचा समारोप १३ ऑगस्ट रोजी नाशिक येथे होणार आहे. यानिमित्ताने सकल मराठा समाजाने ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या जिल्ह्यात शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर, जरांगे यांच्या आंदोलनाला प्रतिआंदोलनाद्वारे शह देण्याचा गजू घोडके यांनी इशारा दिल्याने जरांगे यांची शहरातील फेरी शांततेत होईल का, याची चर्चा सुरू झाली आहे.

हे वाचले का?  Rohit Pawar on Narendra Modi: “भटकत्या आत्म्याची भीती अजूनही…”, रोहित पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले, “महाराष्ट्रात येणं…”!

ओबीसींच्या हक्काला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी सुरुवातीला मराठा आंदोलकांची मागणी होती. नंतर मात्र ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण मिळावे, असा हट्ट जरांगे यांनी धरल्याने आरक्षणाच्या मुद्द्याला नाहक खतपाणी मिळाले. ओबीसी समाजाला महाकष्टाने आरक्षण मिळाले आहे. त्यासाठी कित्येक वर्षे संघर्ष करावा लागला. परंतु, ओबीसींच्या ताटातलेच आरक्षण आम्हाला हवे आणि त्यासाठी दमबाजी, मी याला पाडेल, त्याला पाडेल अशा वल्गना करून सवंग प्रसिद्धी मिळवणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न घोडके यांनी केला.

हे वाचले का?  Maharashtra Weather Update: राज्यात पाऊस पुन्हा परतणार !

प्रत्येकाचा एकेरी उल्लेख करणे, खालच्या पातळीवर उतरून बोलणे, पितृतुल्य व्यक्तींचा आदर न बाळगणे, हे जरांगे यांच्यासारख्या मराठा नेत्याला निश्चितच शोभत नाही. महाराष्ट्र शासनाने मराठा समाजास आरक्षण देण्याची घोषणा केल्यानंतरही सातत्याने आंदोलनाची नौटंकी करणे, सरकारला धमक्या देणे कितपत उचित आहे, याचे आत्मपरीक्षण जरांगेंनी करणे गरजेचे आहे. केवळ विशाल मोर्चे काढून आणि दमबाजीचे राजकारण करून आरक्षण मिळत नसते. त्यासाठी कायदेशीर लढाईच आवश्यक असते. ओबीसीतूनच मराठा समाजास आरक्षण देण्याची मागणी खऱ्या ओबीसींवर अन्याय करणारी असल्याने आम्ही ओबीसी बांधव त्याचा सातत्याने निषेध करू, असे घोडके यांनी स्पष्ट केले. ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण मिळावे हा हट्ट जरांगेंनी सोडल्यास १३ ऑगस्टला त्यांचे स्वागतच केले जाईल. मात्र आपल्या हट्टाला ते चिटकून राहिल्यास त्यांना ओबीसींतर्फे काळे झेंडे दाखविले जातील. त्यादिवशी प्रत्येक ओबीसी बांधव आपल्या घरावर काळी गुढी उभारेल, असा इशाराही घोडके यांनी निवेदनात दिला आहे.