मराठी भाषेसंदर्भात सुप्रिया सुळेंची लोकसभेत मोदी सरकारकडे मोठी मागणी; म्हणाल्या, “येत्या २७ फेब्रुवारीला…”

“जगभरातील लाखो लोक मराठी भाषेवर प्रेम करतात. अनेक साहित्यिक या भाषेत होऊन गेले,” असंही त्या म्हणाल्यात.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही मराठी भाषिक प्रयत्नशील आहोत. केंद्र सरकारसह साहित्य अकादमीकडे सुद्धा याबाबत पाठपुरावा सुरू आहे. आमच्या मागणीचा विचार करून येत्या २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन आहे. त्यामुळे याच दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.

हे वाचले का?  उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाविकास आघाडी सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. साहित्य अकादमीकडेही याबाबत सात वर्षांपूर्वीच शिफारस करण्यात आली आहे, असे त्यांनी लक्षात आणून दिले. काही वर्षांपुर्वी तत्कालिन केंद्रीय मंत्र्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले होते.

गेल्या आठवड्याच विद्यमान केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनीही राज्यसभेत तेच उत्तर दिले. जगभरातील लाखो लोक मराठी भाषेवर प्रेम करतात. अनेक साहित्यिक या भाषेत होऊन गेले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांपासून ज्ञानेश्वरांपर्यंत कितीतरी संतांची ही भाषा आहे, असं सुप्रिया सुळे या मागणीचा पाठपुरावा करताना म्हणाल्या.

हे वाचले का?  “हिंदुंनो परत जा”, अमेरिकेत मंदिराची विटंबना; दहा दिवसांतील दुसरी घटना

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कुसुमाग्रज यांचा जन्मदिन असलेल्या २७ फेब्रुवारी रोजी संपूर्ण जगभर मराठी भाषा दिन साजरा केला जातो. हे सर्व लक्षात घेऊन याच महिन्यात येत्या २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा करण्यात यावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.

हे वाचले का?  Fraud Supreme Court : बनावट सर्वोच्च न्यायालय, बोगस सरन्यायाधीश अन् खोटा निकाल… सायबर ठगांचा व्यावसायिकाला सात कोटींचा गंडा