“मराठे युद्धात जिंकले, पण तहात हरले”, विरोधकांच्या टीकेवर मनोज जरांगेंचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले…

सोशल मीडियावर गप्पा ठोकण्यापेक्षा तज्ज्ञ लोकांनी सरकार दरबारी आपलं म्हणणं मांडावं. सगेसोयरे शब्द फायनल झाल्याने त्यातच महाराष्ट्रातील मराठ्यांचं कल्याण आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन पुकारलं. उपोषण, पदयात्रा, मोर्चा काढून सरकारला मराठा आरक्षणासाठी अधिसूचना काढायला लावली. गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला यश आल्याचं मराठा मोर्चाकडून सांगण्यात आलं. त्यानिमित्ताने वाशीत मोठी सभाही झाली. या सभेत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हस्ते जरांगे पाटलांचं उपोषण सोडवलं. मात्र, त्यानंतर, मराठा आरक्षणाच्या विरोधात असलेल्यांनी मनोज जरांगे पाटलांवर टीका केली. सरकारने अधिसूचना काढल्याने मराठे युद्धात जिंकले खरे, परंतु तहात हरले अशी उपरोधिक टीका मराठा आरक्षण विरोधकांनी केली. यावरून मनोज जरांगे पाटलांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

हे वाचले का?  महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “यावेळी काहीतरी…”

मराठा आरक्षणासाठी सरकारने अधिसूचना काढल्याने मनोज जरांगे पाटील आज (२९ जानेवारी) रायगडाच्या दिशेने निघाले आहेत. उद्या ते रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीचं दर्शन घेऊन तेथील माती कपाळावर लावणार आहेत, अशी माहिती जरांगे पाटलांनी आज माध्यमांना दिली. यावेळी त्यांनी मराठ्यांनी टेन्शन फ्री राहण्याचं आवाहन केलं.

“सरकाने अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेवर सरकारने १५ दिवसांत लोकांचं म्हणणं मागितलं आहे. मराठा आरक्षणाची माहिती असलेले, या विषयातील तज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, वकील, आरक्षणातील खाचखळगे माहित असलेल्या लोकांनी आपलं म्हणणं मांडावं. सगेसोयरे हा शब्द फायनल झाला आहे. नोंद सापडलेल्यांमुळे नोंद न सापडलेल्या मराठ्यांना सगेसोयरे शब्दामुळे फायदा होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर गप्पा ठोकण्यापेक्षा तज्ज्ञ लोकांनी सरकार दरबारी आपलं म्हणणं मांडावं. सगेसोयरे शब्द फायनल झाल्याने त्यातच महाराष्ट्रातील मराठ्यांचं कल्याण आहे”, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

हे वाचले का?  Manoj Jarange : “बेगडी उपोषण करण्यापेक्षा…”, आंदोलन स्थगित करताना मनोज जरांगे असं का म्हणाले?

दरम्यान, “छगन भुजबळांनीही ओबीसी समाजातील तज्ज्ञांना हरकती पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. यावरून छगन भुजबळ म्हणाले, छगन भुजबळांचा हा धंदाच आहे. मराठ्यांचं चांगलं झालेलं त्यांना पाहवत नाही. ओबीसींचाही फायदा झाला पाहिजे अशी आमची नियत आहे. परंतु, लोकांच्या अन्नात माती कालवण्याची नियत आमची नाही. त्यामुळे मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. समाजाला कुठे काही अडचण आली तर मी आंदोलनासाठी तयार आहे”, असा इशाराही त्यांनी दिला.

तह झालेला नाही

तसंच, मराठे युद्धात जिंकले परंतु, तहात हरले अशी सोशल मीडियावर चर्चा आहे. या चर्चेवर मनोज जरांगे म्हणाले, “तह झालेला नाही. मराठे जिंकून आले आहेत. कायदा झालेला आहे. सगेसोयरे संदर्भातही कायदा झाला आहे. त्यामुळे मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाही तरी अडचण नाही. कोणीही टेन्शन घ्यायचं नाही. फक्त सर्व मराठ्यांनी एकजूट राहा. एकत्र या”, असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं.