महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या कंपन्यांना आंदोलनाची नोटीस दिली आहे.
नागपूर : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या कंपन्यांना आंदोलनाची नोटीस दिली आहे. महावितरण, महानिर्मिती, महापारेषणमधील ८६ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत. त्यावर सरकारसोबत अनेक चर्चा व बैठकी झाल्या. परंतु बैठकांमधील निर्णयाचीही अंमलबजावणी होत नाही, असा आरोप करीत वीज अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या आंदोलनाची नोटीस तिन्ही वीज कंपन्यांसोबतच ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, प्रधान ऊर्जा सचिव कार्यालयांनाही दिल्याचे फेडरेशनचे राज्य सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात १४ डिसेंबरला राज्यातील सर्व वीज कार्यालयांपुढे तर दुसऱ्या टप्प्यात २२ डिसेंबरला राज्यातील सर्व झोन कार्यालयांपुढे द्वारसभा व निदर्शने केली जातील. तिसऱ्या टप्प्यात २८ डिसेंबरला प्रकाशगड/ प्रकाशगंगा कार्यालयापुढे धरणे व मोर्चा काढला जाईल. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचाही इशारा भोयर यांनी दिला.
मागण्या काय?
- वीज देयक थकबाकी वसुलीसाठी स्वतंत्र यंत्रणा करा
- कामगार कायद्यानुसार आठ तासच काम घ्या
- अंतर्गत भरतीकरिता राखीव पदाची जाहिरात तत्काळ काढा
- महावितरणमधील तांत्रिक कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने वाहन भत्ता द्या
- तिन्ही वीज कंपन्यांतील ४३ हजारांवर रिक्त जागा भरा
- तिन्ही कंपन्यांतील कंत्राटी व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना स्थायी करा.