महाराष्ट्राची कुस्ती पोरकी झाली ! पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन

कोल्हापुरात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातलं मोठं नाव आणि पहिला मानाचा हिंदकेसरी किताब पटकावणारे श्रीपती खंचनाळे यांचं निधन झालं आहे. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून खंचनाळे यांची तब्येत बिघडली होती, कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेरीस उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

खंचनाळे हे मुळचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा या भागातले…१९५९ साली पंजाब केसरी बनाता सिंगला धोबीपछाड देत श्रीपती खंचनाळे यांनी हिंदकेसरची गदा पटकावत कोल्हापूरचं नाव उज्वल केलं. याच वर्षात खंचनाळे यांनी कराड येथे झालेल्या महाराष्ट्र केसरीचंही विजेतेपद पटकावलं होतं. १९५८, १९६२ आणि १९६५ साली झालेल्या ऑल इंडिया चॅम्पिअनशीप स्पर्धेची विजेतेपदही खंचनाळे यांनी पटकावली होती. श्रीपती खंचनाळे यांच्यावर उपचार सुरु असताना कोल्हापूरचे आमदार ऋतुराज पाटील यांनी क्रीडामंत्री सुनिल केदार यांच्याकडे पाठपुरावा करत त्यांच्या उपचारासाठी सरकारकडून ५ लाखांची मदत मिळवून दिली होती.

हे वाचले का?  Maharashtra News Live: ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेच्या वडिलांची राज्य सरकारवर टीका; म्हणाले, “त्याला पाच कोटी आणि…”

आपल्या कारकिर्दीत शाहुपुरीत कुस्तीचे धडे गिरवणाऱ्या खंचनाळे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. खंचनाळे यांचं पार्थिव कोल्हापुरातील शाहुपुरीत पैलवानांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर त्यांचं पार्थिव हे त्यांच्या रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी नेण्यात येईल.