महाराष्ट्राच्या हद्दीत गुजरातचे अतिक्रमण

पालघर जिल्ह्य़ातील वेवजीमध्ये दीड किलोमीटर आत पथदिव्यांचे खांब!

पालघर जिल्ह्य़ातील वेवजीमध्ये दीड किलोमीटर आत पथदिव्यांचे खांब!

नितीन बोंबाडे, लोकसत्ता

डहाणू : महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या गुजरातमधील सोलसुंभा ग्रामपंचायतीने आपले पथदिव्यांचे खांब पालघर जिल्ह्य़ातील वेवजी गावात रोवल्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये सीमा तंटा उद्भवण्याची चिन्हे आहेत.

वेवजी हे पालघर जिल्ह्य़ाच्या तलासरी तालुक्यातील गुजरातच्या सीमेवरील गाव असून तेथे गुजरातमधील सोलसुंभा ग्रामपंचायतीने पथदिव्यांचे ४०हून अधिक खांब बसवले आहेत. गुजरातमधील नागरिकांनी वेवजी गावात अतिक्रमणे केल्याचा आणि सीमेवरील महाराष्ट्राची हद्द दर्शवणारे चिऱ्याचे चिन्हही तोडण्यात आल्याचा आरोप वेवजी ग्रामस्थांनी केला आहे. वेवजी ग्रामस्थांनी अतिक्रमणाविरोधात तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायतीने सोलसुंभा ग्रामपंचायतीला पथदिव्यांचे खांब हटवण्यास सांगितले. मात्र, सोलसुंभा ग्रामपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता या वादाची तीव्रता वाढू लागली असून तो सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी वेवजी ग्रामस्थांनी केली आहे.

वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सव्‍‌र्हे क्रमांक २०४ चा भूखंड आणि सोलसुंभा ग्रामपंचायतीच्या हद्दीत सव्‍‌र्हे क्रमांक १७३ या दोन भूखंडांवरून दोन्ही राज्यांतील सामाईक सीमा गेल्या आहेत. तलासरी-उंबरगाव राज्य मार्गावर गुजरातच्या सव्‍‌र्हे क्रमांक १७३चा ३०० मीटरचा त्रिकोणी आकाराचा भूखंड महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याला जोडला आहे. हा रस्ता ३०० मीटरनंतर पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या सव्‍‌र्हे क्रमांक २०४ला मिळतो. परंतु येथे दोन्ही राज्यांनी हद्द निश्चित केलेली नाही. या त्रिकोणी कोपऱ्याच्या आधारे गुजरातच्या ग्रामपंचायतीने महाराष्ट्राच्या हद्दीत सुमारे दीड किलोमीटर आत अतिक्रमण केले आहे.

हे वाचले का?  Maharashtra News Live : “फोन आला अन् एक गाडी सोडली”; खेड-शिवापूर पाच कोटींची रक्कम जप्त प्रकरणी संजय राऊतांचा गंभीर आरोप

काही दिवसांपूर्वी शैक्षणिक सोयी-सुविधेचे कारण पुढे करत सोलसुंभा ग्रामपंचायतीने पथदिव्यांचे खांब उभे केले. त्यासाठी वेवजी ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहार केला. मात्र, प्रत्यक्षात हे खांब सोलसुंभाच्या हद्दीतील इंडिया कॉलनी या वसाहतीच्या सोयीसाठी उभारण्यात आल्याचे वेवजी ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यानंतर वेवजी ग्रामपंचायतीने सोलसुंभा ग्रामपंचायतीला आपल्या हद्दीतील पथदिव्यांचे खांब हटवण्याच्या सूचना केल्या. तसा ठरावही ग्रामपंचायतीने केला. मात्र, सोलसुंभा ग्रामपंचायतीने हे खांब कायम ठेवले आहेत. ही जागा आपली असल्याचा दावा करत सोलसुंभाचे रहिवासी तेथे अतिक्रमण करत असल्याचे वेवजी ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

वेवजीच्या सीमेवर महाराष्ट्राची हद्द सांगणाऱ्या फलकासमोरच गुजरातच्या इमारती उभ्या राहात आहेत. दोन्ही राज्यांची हद्द निश्चित न केल्यामुळे दोन्ही गावांतील ग्रामस्थांमध्ये वारंवार वाद होतात. महाराष्ट्राची हद्द दर्शवणारा चिराही तोडण्यात आला आहे, असे वेवजीच्या उपसरपंच अनंता खुलात यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

हे वाचले का?  Shivaji Maharaj Statue : शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, नव्या पुतळ्यासाठी योजना तयार

औद्योगिक महत्त्वामुळे अतिक्रमण?

गुजरातमधील उंबरगाव हे रेल्वे स्थानक महत्त्वाचे ठरू लागले आहे. या परिसरातच गुजरातची औद्योगिक वसाहत विकसित झाली आहे. या दोन्ही ठिकाणांना जोडणारा नजीकचा रस्ता वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जातो. त्यामुळेच आता या रस्त्याकरिता गुजरातमधील सोलसुंभा ग्रामपंचायत अतिक्रमण करीत असल्याचा आरोप आहे.

सीमा निश्चितीची मागणी

सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक ग्रामपंचायत, भूमी अभिलेख आणि महसूल खात्याच्या परवानगीने गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमा निश्चित कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा चिरा दहा वर्षांपूर्वी हद्दीच्या १०० मीटर पुढे होता. मात्र, आता तो दिसत नाही. आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेळोवेळी त्याला विरोध केला. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालणे आवश्यक आहे.

– अनंता चैत्या खुलातउपसरपंचवेवजी

न्ही राज्यांनी सीमा निश्चित करणे आवश्यक आहे. त्यासाठी वेवजी आणि सोलसुंभा दोन्ही सीमांवरील नकाशे मागवून त्यातून तोडगा काढावा लागेल.

– राजेंद्र चव्हाणउपअभियंतातलासरी

या सीमावादाला आम्हा ग्रामस्थांना तोंड द्यावे लागते. पालघर आणि वलसाड अशा दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही पत्रव्यवहार केला होता. वलसाडचे महसूल अधिकारी त्या जागेची कागदपत्रेही सादर करू शकले नाहीत. परंतु वाद कायम आहे. आता आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागणार आहोत.

हे वाचले का?  “बॉम्बेचं मुंबई करण्यात तुमचं योगदान असेल, तर…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल!

– अशोक रमण धोडीनागरिकवेवजी

वाद काय?

’महाराष्ट्रातील वेवजी आणि गुजरातमधील सोलसुंभा गावांदरम्यान असलेल्या दोन्ही राज्यांच्या सीमेवर एक त्रिकोणी आकाराचा भूखंड आहे.

’या त्रिकोणी कोपऱ्याच्या आधारे गुजरातमधील ग्रामपंचायतीने दीड किलोमीटर आत अतिक्रमण केले आहे.

’या संदर्भात वेवजी ग्रामपंचायतीने वारंवार पत्रव्यवहार करूनही गुजरातमधील सोलसुंभा ग्रामपंचायतीने पथदिव्यांचे खांब हटवण्याकडे दुर्लक्ष केल्याचे वेवजीच्या सरपंच सरिता उराडे यांनी सांगितले.