महाराष्ट्राचे सौंदर्य पर्यटकांना अनोख्या पद्धतीने अनुभवता येणार
पर्यटन धोरण- २०१६ मधील तरतूदीनुसार तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पयर्टनाच्या दृष्टीने पर्यटक खाजगी वाहनाने प्रवासास प्राधान्य देत आहेत हे पाहता, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्क या सुविधा पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यासाठी कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये या कॅराव्हॅन पर्यटन धोरणास मंजुरी देण्यात आली. या धोरणाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाल्यास परदेशामध्ये एखाद्या ठराविक ठिकाणी मोठ्या संख्येने कॅरॅव्हॅन उभ्या करुन पर्यटक एकत्र जमतात तसेच चित्र लवकरच महाराष्ट्रात दिसू शकेल.
कॅरॅव्हॅन पार्क आणि कॅरॅव्हॅन असे दोन भाग या धोरणात असून यामुळे राज्यातील वैविध्यपूर्ण निसर्ग सौंदर्याचा लाभ सहजपणे पर्यटकांना घेता येईल. तसेच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी या धोरणांचा हातभार लागणार आहे. मुद्रांक शुल्कामध्ये सूट, राज्य वस्तु व सेवा कराचा परतावा, विद्युत शुल्कामध्ये सूट यासारखी प्रोत्साहने कॅरॅव्हॅन पार्क तसेच कॅरॅव्हॅन पर्यटनाकरीता लागू केल्या जाणार आहेत. पर्यटन संचालनालयाकडे कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्कची नोंदणी आवश्यक असणार आहे. कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्क व्यावसायिकांना पर्यटन संचालनालयामार्फत मार्केटिंग, स्वच्छता, व्यवस्थापन यांचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच त्यांची प्रसिध्दी देखील करण्यात येईल असं सरकारने स्पष्ट केलं आहे. या कॅरॅव्हॅन पार्क आणि कॅरॅव्हॅनवर आधारित पर्यटन संकल्पनेमुळे पर्यटकांना राहण्याची सुविधा तसेच खाजगी गुंतवणूकीसही प्रोत्साहन मिळेल. कौटुंबिक सहलींचे आयोजन, हॉटेल्स आणि रिसॉर्ट या पारंपरिक निवास व्यवस्थेपेक्षा वेगळा अनुभव, ना विकास क्षेत्राचा योग्य वापर, दुर्गम भागातील पर्यटनाला चालना देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे यामुळे शक्य होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पर्यटन विकासाच्या अनुषंगाने कॅराव्हॅन पर्यटन धोरणास मंजुरी देण्यात आल्याने महाराष्ट्राचे सौंदर्य पर्यटकांना अनोख्या पद्धतीने अनुभवता येईल, अशी प्रतिक्रिया या निर्णयासंदर्भात बोलताना राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पर्यटन विकासाच्या अनुषंगाने कॅराव्हॅन पर्यटन धोरणास मंजुरी देण्यात आल्याने महाराष्ट्राचे सौंदर्य पर्यटकांना अनोख्या पद्धतीने अनुभवता येईल
कॅरॅव्हॅन पार्क : यामध्ये मुलभूत सोयी सुविधांनी युक्त अशा जागेवर कॅरॅव्हॅन पार्क उभी करून मुक्काम करता येईल. यामध्ये लहान मोठ्या आकाराच्या कॅरॅव्हॅन उभ्या करता येतील. असे पार्क खाजगी किंवा शासकीय जमिनीवर स्वत: जमीन मालक किंवा विकासक उभारु शकतील. वाहनतळाच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा तसेच स्वतंत्र पाणी, रस्ते व वीज जोडणी असेल. या ठिकाणी पर्यटक सुविधा केंद्र, उद्यान देखील असेल. कॅरॅव्हॅन पार्क मालकांनी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करणे अपेक्षित आहे. याठिकाणी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे देखील असतील व विकलांगाकरिता देखील व्हिलचेअर वगैरे सुविधा असतील. यासाठीच्या आवश्यक त्या परवानग्या स्थानिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जातील. एमटीडीसीच्या पर्यटक निवासांच्या परिसरात किंवा त्यांच्या मोकळ्या जमिनीवर तसेच कृषी पर्यटन केंद्रांच्या ठिकाणी देखील कॅरॅव्हॅन पार्क करता येतील.
कॅरॅव्हॅन : या व्हॅन्समध्ये बेडची सुविधा असलेले किचन, टॉयलेट, सोफा, टेबल असून विश्रांती आणि निवासाच्या दृष्टीने त्याची बांधणी केली असेल. सिंगल एक्सेल कन्व्हेंशल कॅरॅव्हॅन, टि्वन एक्सल कॅरॅव्हॅन, टेन्ट ट्रेलर, फोल्डिंग कॅरॅव्हॅन, कॅम्पर ट्रेलर अशा प्रकारचे कॅरॅव्हॅनचे विविध प्रकार असतील. परिवहन आयुक्तांकडे या कॅरॅव्हॅनची नोंदणी करावी लागेल. कॅरॅव्हॅन पार्क व कॅराव्हॅन तसेच हायब्रीड कॅरॅव्हॅन पार्कची नोंदणी पर्यटन संचालनालयाकडे करावी लागेल. तसेच टूर ऑपरेटरची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर करता येईल. यासाठी नोंदणी शुल्क ५ हजार व नुतनीकरणासाठी २ हजार रुपये शुल्क असेल. कॅरॅव्हॅन पर्यटन धोरणासंदर्भात राज्यस्तरीय समिती असून पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अध्यक्ष असतील असाही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.