महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पुणे जिल्ह्यासहीत अनेक ठिकाणी गारपीट, मुंबईसह उपनगरांमध्येही पावसाची हजेरी

अंब्याच्या पिकाबरोबरच अनेक जिल्ह्यांमधील शेतमालाचं नुकसान

कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यात सर्वत्र किमान तापमानात वाढ होऊन गारवा घटला असून, त्यामुळेच आज राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.  हवामान विभागाने यापूर्वीच अशाप्रकारे अवकाळी पाऊस राज्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात होणार असल्याचा इशारा दिला होता. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हवामान खात्याचा अंदाज आज खरा ठरला. मुंबई, मुंबई-उपनगरे, पुणे, नाशिक, जालनासहीत मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. पुण्यात अनेक ठिकाणी गाराही पडल्याचे वृत्त आहे. मुंबई उपनगरांमधील नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबवलीसहीत अंबरनाथमध्येही मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे अंब्याच्या पिकाबरोबरच अनेक जिल्ह्यांमधील शेतमालाचं मोठं नुकसान झालं आहे.

हे वाचले का?  ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी क्रीडा संकुलासाठी अखेर २५.७५ कोटींचा निधी मंजूर

सध्या उत्तर मध्य महाराष्ट्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वादळ सदृष्य परिस्थिती निर्माण झालीय. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये यामुळे गारपीट झाली असून उद्याही पाऊस आणि गारपीट सुरु राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्कायमेट या खासगी हवामानशाळेचे उपाध्यक्ष महेश पळवट यांनी यासंदर्भातील ट्विट केलं आहे.

उत्तरेकडून महाराष्ट्रात येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह सध्या पूर्णपणे थांबले आहेत. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून उष्ण वारे वाहत आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी गारवा घटला असून. गेल्या आठवड्यात थंडीचे प्रमाण अधिक असलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातही सध्या रात्रीचे किमान तापमान सरासरीपुढे गेले आहे. मध्य महाराष्ट्रातही सर्वत्र तापमान सरासरीपुढे गेले आहे. १६ फेब्रुवारीपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाला सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

१७ फेब्रुवारीला मराठवाडा आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पाऊस होईल असं सांगण्यात आलं होतं. विदर्भ, मराठवाडा, कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची हजेरी लावली आहे.

बदल कशामुळे?

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून हळूहळू उष्ण वारे, बाष्प येण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागात वाऱ्यांची चक्रीय स्थिती आहे. केरळ किनारपट्टी लगतच्या आग्नेय अरबी समुद्रापासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत झाला आहे. त्याची तीव्रता वाढून राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण होईल. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस अधिक असेल. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.