महाराष्ट्राला काय दिले, पवारांनीच हिशेब द्यावा! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका

नांदेड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नायगाव मतदारसंघातील नरसी येथे झालेल्या जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्र्यांनी पवार-ठाकरेंसह राज्यातील महाविकास आघाडीची खिल्ली उडवली.

नांदेड : डॉ.  मनमोहनसिंग-सोनिया गांधी यांच्या यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या राजवटीत महाराष्ट्राला काय दिले, याचा हिशेब शरद पवार यांना द्यावाच लागेल, असे बजावतानाच पवार आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा विकास करू शकत नाहीत, असा घणाघाती टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी येथे लगावला. 

नांदेड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नायगाव मतदारसंघातील नरसी येथे झालेल्या जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्र्यांनी पवार-ठाकरेंसह राज्यातील महाविकास आघाडीची खिल्ली उडवली. ठाकरेंची सेना आणि पवारांची राष्ट्रवादी नकली असून या दोघांनी काँग्रेस अर्धीमूर्धी करून टाकली असल्याचे शहा यांनी नमूद केले. 

हे वाचले का?  भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?

नरसीतील भव्य पटांगणावर पार पडलेल्या या सभेच्या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, भाजपाचे संघटनमंत्री संजय कौडगे, आमदार राम पाटील रातोळीकर यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामटेकच्या सभेत पवारांना लक्ष्य केले होते तर गुरुवारी शाहंनी पवारांचे नाव घेऊन काही सवाल केले. पवार केंद्रात मंत्री असताना दहा वर्षांत महाराष्ट्राला १ लाख ९१ हजार कोटी रुपये मिळाले होते, तर मोदींच्या १० वर्षांत केंद्राकडून महाराष्ट्राला ७ लाख १५ हजार कोटी रुपये मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदींनी गरिबांच्या कल्याणासाठी काम केले. महाराष्ट्रासह देशामध्ये वेगवेगळय़ा योजनांच्या माध्यमातून लोकांना मूलभूत सोयीसुविधा दिल्या. देशाचा सर्वागीण विकास मोदीच करू शकतात, असा दावा करून ही निवडणूक मजबूत भारताचा पाया घालणारी आहे. २०४७ पर्यंत देशाला पूर्ण विकसित करायचे आहे, असेही ते म्हणाले.

हे वाचले का?  Crime News : ट्यूशनवरुन घरी पतरणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, बेशुद्धावस्थेत सापडली मुलगी, कुठे घडली घटना?

काँग्रेसची फरफट- फडणवीस

 शाह यांच्या भाषणापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमधील उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर प्रचंड मतांनी विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर या पक्षाची अवस्था ना घर का ना घाट का, अशी झाली आहे. पवार आणि ठाकरे यांच्यासमोर काँग्रेसची फरफट होत असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.