महाराष्ट्रासह ३४ राज्यांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत घट

करोनास्थिती सध्या नियंत्रणात असून तिसरी लाट ओसरत असल्याचे सांगण्यात आले. २६८ जिल्ह्यांमध्ये एकूण चाचण्यांपैकी रुग्ण आढळण्याचा दर (पॉझिटिव्हीटी रेट) पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, तमीळनाडूसह देशभरातील ३४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील करोनाबाधितांची संख्या आणि रुग्ण आढळण्याचा दर घटला असल्याचे केंद्र सरकारने गुरुवारी सांगितले. मात्र केरळ, मिझोरम या राज्यांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत अजूनही वाढ होत असल्याचेही केंद्र सरकारकडून सांगण्यात आले.

करोनास्थिती सध्या नियंत्रणात असून तिसरी लाट ओसरत असल्याचे सांगण्यात आले. २६८ जिल्ह्यांमध्ये एकूण चाचण्यांपैकी रुग्ण आढळण्याचा दर (पॉझिटिव्हीटी रेट) पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. करोना प्रतिबंधक लसीकरणामुळे करोना रुग्णवाढीचा दर तसेच मृत्युदरही घटला आहे. घटत्या रुग्णसंख्येमुळे करोना संक्रमण कमी झाल्याचे दिसून येत असल्याचे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले

हे वाचले का?  Raj Thackeray on Badlapur Case: बदलापूर प्रकरणावर राज ठाकरेंचं मोठं भाष्य; कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले, “त्या मुलींना आणि घरच्यांना…”

दुसऱ्या लाटेच्या तुलनेत या लाटेत सरासरी ४४ वर्षे वयाचे नागरिक अधिक बाधित झाल्याचे आढळले. मागील लाटेत ही प्रमाण सरासरी ५५ वर्षे होते. या लाटेत बहुतेक रुग्णांना केवळ घशाची खवखव हे लक्षण आढळले. अनेक रुग्णांना उपचारासाठी औषधांची गरज भासली नाही, असे सरकारच्या वतीने नोंदवण्यात आले.

काही राज्यांत शाळा सुरू

११ राज्यांमध्ये शाळा पूर्णपणे खुल्या झाल्या आहेत. १६ राज्यांमध्ये उच्च वर्ग अंशत: खोलण्यात आले, तर नऊ राज्यांमध्ये अजूनही शाळा बंद आहेत. शाळांमधील ९५ टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले आहे. काही राज्यांमध्ये १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.