राज्यात भारनियमन होऊ नये यासाठी वीज उत्पादन वाढविण्यासाठी नियोजन केले जात आहे, अशी ग्वाही ऊर्जामंत्र्यांनी दिली.
मुंबई : कोळसा पुरवठय़ातील व्यवस्थापन त्रुटींबाबत कोळसा मंत्रालयाच्या सचिवांनी कोल इंडियाचे प्रमुख प्रमोद अग्रवाल यांना खरमरीत पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. यावरून केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कोल इंडियाच देशातील वीज प्रकल्पांतील कोळसाटंचाईला आणि पर्यायाने वीजटंचाईला जबाबदार आहे आणि या विषयावर भाजपचे नेते देशाची दिशाभूल करत असल्याचे स्पष्ट होते, अशा शब्दांत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्ला चढवला. तसेच राज्यात भारनियमन होऊ नये यासाठी वीज उत्पादन वाढविण्यासाठी नियोजन केले जात आहे, अशी ग्वाही ऊर्जामंत्र्यांनी दिली.
राज्यातील कोळसाटंचाई आणि त्यामुळे वीजनिर्मितीत झालेली घट या विषयावर मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोळसाटंचाईमुळे राज्यातील वीजनिर्मिती कमी झाली असून गरजेनुसार खुल्या बाजारातून महागडय़ा दराने वीज खरेदी करून ग्राहकांची विजेची गरज भागवली जात आहे. कोळशाअभावी आणखी महिनाभर वीजटंचाईचे सावट राहील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. राज्यात मागणीच्या तुलनेत ३ हजार मेगावॉट विजेची कमतरता जाणवत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. घरातील विद्युत उपकरणांचा कमीत कमी वापर करून वीज बचत करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यातील महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पांना कोळशाचा नियमित पुरवठा व्हावा, यासाठी मी मागील दोन महिन्यांपासून केंद्रीय कोळसामंत्री प्रल्हाद जोशी व केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांच्याशी नियमित संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. कोळसा वाहून नेण्याची कोल इंडियाची रोजची क्षमता ४० लाख मेट्रिक टन आहे. मात्र पावसामुळे ती २२ लाख मेट्रिक टन इतकी कमी झाली होती. ती आता २७ लाख मेट्रिक टनापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे कोल इंडियाने आपल्या वहन क्षमतेनुसार पुरवठा करावा, यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचेही राऊत यांनी सांगितले.
गुजरात, गोव्याकडे अतिरिक्त वीज कशी?
महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत कोळशाअभावी वीजटंचाई असताना गुजरात आणि गोवा या भाजपशासित राज्यांत अतिरिक्त वीज असून ते खुल्या बाजारात वीज विकत आहेत हे कसे काय, असा सवाल नितीन राऊत यांनी केला.
कोळसा तुटवडय़ाला मोदी सरकार जबाबदार – मलिक
मुंबई: देशात मोठय़ा प्रमाणावर कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे, त्याला के ंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना केला.
कोळसा मिळत नसल्याने देशातील व राज्यातील बरेच वीजनिर्मितीचे संच बंद पडले आहेत.
कोळसा आयात करूनही तो उपलब्ध होत नाही. आयातीमुळे या देशातील जे परकीय चलन आहे ते जास्त खर्च होत आहे, असे त्यांनी सांगितले.